पुण्यातील विकास प्रकल्पांचा ‘कांजूरमार्ग’ होऊ देणार नाही ! माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची आदित्य ठाकरेंवर टीका
पुणे, ७ मे २०२३ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर पक्षाचे नेतै आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील वेताळ टेकडी रस्ता व नदी काठ सुधार प्रकल्पाला विरोध केल्याने त्यावर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी टीका केली. मुंबईतील आरे कारशेडचे काम थांबवून कांजूरमार्गच्या जागेवर तीन मेट्रो लाईन्सच्या कारशेडचा अत्यंत अव्यवहार्य पर्याय निवडला होता. स्वतःच्या ‘इगो’पायी मुंबईकरांच्या डोक्यावर १० हजार कोटींचा बोजा आला. अशी चूक पुण्यात होऊ देणार नाही, पुण्यातील विकास प्रकल्पांचा ‘कांजूरमार्ग’ होऊ देणार नाही, अशी भूमिका मोहोळ यांनी मांडली.
पर्यावरणाचं रक्षण आणि ज्वलंत नागरी प्रश्नांची सोडवणूक यांचा समतोल न राखता येणाऱ्यांनी पुण्यात येऊन अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे काहीही बोलावे, हा मोठा विनोद आहे.
आदित्य ठीकरे मी स्वतः पुण्याचा महापौर राहिलेलो आहे. तुमच्यापेक्षा पुण्याची, पुणेकरांच्या नागरी प्रश्नांची आणि पर्यावरणाची आपल्यापेक्षा अधिक जाण आणि तळमळ आहे. कधीतरीच पुण्यात प्रकटून पुणेकरांबद्दलची खोटी आणि संधीसाधू तळमळ दाखवू नका.
नदीकाठसुधार आणि बालभारती-पौडफाट रस्ता हे दोन्ही विकास प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊनच पुढे नेण्यात येत आहेत. तरीही यावर काही पुणेकरांचे आक्षेप असल्यावर त्यावर निश्चितच सुचनांचा विचार करुन पुढे जाऊ.
पण बालभारती-पौडफाटा रस्ता रद्दच करण्याची मागणी करण्याचा आदित्य यांना नैतिक अधिकार काय? केवळ विरोधाला विरोध म्हणून राजकारण करण्याच्या प्रयत्नांना सुज्ञ पुणेकर थारा देणार नाहीत, असेही मोहोळ म्हणाले.