काँग्रेस मधून हकालपट्टी झालेले देशमुख भाजपमध्ये करणार प्रवेश

नागपूर, १४ जून २०२३ : काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी पक्ष शिस्त मोडल्यामुळं त्यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळं आता देशमुख काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होत. ते भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, आता त्यांचा भाजप पक्ष प्रवेशाचा दिवस ठरला असून येत्या रविवारी म्हणजे १८ जूनला त्यांचा प्रवेश होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. काँग्रेसमधून निलंबनानंतर ते भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

२००९ मध्ये सावनेर विधानसभेत देशमुख यांचा भाजपकडून पराभव झाला होता. त्यानंतर २०१४. मध्ये ते काटोलमधून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. मात्र, भाजपच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले.

आशिष देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून उघडेपणे कॉंग्रेसविरोधी भूमिका घेत होते. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अनेकदा वक्तव्ये केली होती. पटोले यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून दरमहा एक खोका मिळतो, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना सहा वर्षासाठी निलंबित केलं होतं.

दरम्यान, आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप पक्ष प्रवेशानंतर आशिष देशमुख यांना काटोल किंवा सावनेर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप