सुजय विखेंना पराभव अमान्य : १९ लाख रुपये भरुन केली पुन्हा इव्हीएम तपासणीची मागणी

अहमदनगर, २० जून २०२४ : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा २८ हजार मतांनी पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी विखेंना आस्मान दाखवले. हा निकाल लागून आता १५ दिवस झाले आहेत. पण विखेंनी अजूनही हा पराभव स्वीकारलेला नाही. त्यांनी थेट ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका घेतली असून ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएमची चौकशी करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी त्यांनी सुमारे 18 लाख रुपयेही भरले असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजय विखे यांनी १० जून रोजीच ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यात श्रीगोंदाचे १०, पारनेर १०, नगर ५, शेवगाव-पाथर्डी ५, कर्जत-जामखेड ५, राहुरी ५ अशा एकूण ४० केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी विखे यांनी केली आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्राचे जीएसटीसह ४७ हजार २०० रुपये याप्रमाणे १८ लाख ८८ हजार रुपये शुल्कही त्यांनी भरले आहे. नियमानुसार, निकालानंतर सात दिवसांत उमेदवाराने पडताळणी संदर्भात मागणी करायची असते. त्यानुसार डॉ. विखे पाटील यांनी १० जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली.

पारनेरचे आमदार असलेल्या निलेश लंके यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यापासून लंके आणि सुजय विखे यांच्यामध्ये चुरशीची निवडणूक सुरु झाली. निलेश लंके यांना इंग्रजी बोलता येत नसल्यान ते संसदेत जाऊन काय करणार? असा प्रश्‍न विखे पाटील यांनी भर सभेत विचारला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध टिकेची झोड उठली होती. निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी विखेंसाठी सभा घेतली तर शरद पवार यांनी लंकेसाठी निवडणूक घेतली. या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटपही करण्यात आले. अखेर मतमोजणीमध्ये दोघांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून आली. यात निलेश लंके यांनी बाजी मारून जायंट किलरची भूमिका बजावली. या मतदारसंघातील निकालात प्रस्थापित विखे पाटील यांना झटका बसल्याने त्याची राज्यभर चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र अजूनही विखे यांनी पराभव मान्य न करता हीहीपॅटवर संशय घोत त्यांची चौकशी करण्यासाठी १८ लाख ८८ हजार रुपये शुल्क शासनाकडे भरले आहे.