प्रकाश आंबेडकरांमुळे २०१९ साली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ९ खासदारांचा पराभव: पृथ्वीराज चव्हाणांचं विधान
मुंबई, १५ जानेवारी २०२४: २०१९ साली प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुले काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ९ खासदारांचा पराभव झाला होता. यामुळे भाजपाचे ९ खासदार निवडून आले होते. मात्र, आता प्रकाश आंबेडकर ‘इंडिया’ आघाडीबरोबर येतील, अशी आशा माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
“शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून बाकीचे पक्षही आमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आमच्याबरोबर असला पाहिजे. पण, ‘इंडिया’ आघाडीला छेद देण्यासाठी जास्तीत जास्त पक्षांनी उभं राहून विरोधकांच्या मतांचं विभाजन होण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
“प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, आप, ‘एमआयएम’ने उमेदवार उभे केले तर नुकसान कोणाचं होणार आहे? फायदा कुणाचा होणार आहे? प्रकाश आंबेडकरांच्या डोक्यात काय चाललंय हे आतमध्ये जावून पाहता येत नाही. पण, प्रकाश आंबेडकरांच्या पक्षामुळे २०१९ साली काँग्रेस-राष्ट्रवादीचे ९ खासदारांचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपाचे ९ खासदार निवडून आले होते. पण, प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर येतील. “आंबेडकर हे नाव देशात कुणाकडेही नाही. देशात एवढा मोठा दलित नेता कुणीही नाही. प्रकाश आंबेडकर देशाचे नेते होऊ शकतात,” असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“मोदींनी संविधान बदललं, तर त्याला जबाबदार कोण असेल?”
“प्रकाश आंबेडकरांनी ‘इंडिया’ आघाडीचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटावं. अथवा पत्र लिहावं. पण, याआधी प्रकाश आंबेडकरांनी कुठल्यातरी प्रवक्त्याच्या माध्यमातून खर्गेंना पत्र लिहिलं होतं. हा खर्गेंचा अपमान आहे. प्रकाश आंबेडकरांच्या ‘इंडिया’ आघाडीतील प्रवेशला कुणाचाही विरोध नाही. मात्र, मतांची टक्केवारी, निवडून येण्याची क्षमता पाहून व्यवहारिकरित्या जागांची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली पाहिजे. उद्या मोदींनी संविधान बदललं, तर त्याला जबाबदार कोण असेल?” असा सवालही पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला. संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा केली पाहिजे, असं मी काँग्रेसच्या बैठकीत सांगितलं आहे,” असेही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.