कमी होत चाललेली भूजल पातळी चिंताजनक – डॉ. सुरेश गोसावी
पुणे, १४/१२/२०२३ – सध्या भूजल हा महत्त्वाचा पाण्याचा स्त्रोत असून त्यांची कमी होत चाललेली पातळी चिंताजनक आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याच्या दूर्भिक्षापासून वाचायचे असेल तर जलसंस्करणावर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले. विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमत्त ‘४५ व्या भारतीय भूगोल काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅशनल असोसिएशन ऑफ जिओग्राफ्रर्स इन इंडियाचे अध्यक्ष प्रा.श्रीकुमार चट्टोपाध्याय हे होते. तर फ्रांसमधील रियुनियन आयलँड या विद्यापीठातील भूगोल या विषयाचे प्रा. डॉ. बीट्रिस मोपर्ट, श्रीलंकेमधील केलानिया विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रा. एल. एम. धरमसीरी, बिहारच्या मगध विद्यापीठातील प्रा. डॉ. राना प्रताप, नॅशनल असोसिएशन ऑफ जिओग्राफ्रर्स इन इंडियाचे सचिव ए.के. सहाय हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
देशात बऱ्याच शहरातील नद्याचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे स्त्रोतापासून शहरापर्यंत येणाऱ्या पाण्याच्या मार्गावर प्रदुषण होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच अनेक शहरांमध्ये पावसाचे प्रमाण जरी चांगले असले तरी पावसाच्या पाण्याचे नीट नियोजन केले नसल्यामुळे बरेच पाणी निरूपयोगी ठरत असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्रीकुमार चट्टोपाध्याय यांनी सांगितले. विद्यापीठाच्या भुगोल विभाग आणि नॅशनल असोसिएशन ऑफ जिओग्राफ्रर्स इन इंडिया यांच्या संयुक्त विद्यामाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘पर्यावरण, विकास आणि शाश्वतता – संवेदनक्षम भविष्यासाठी भूगोलाची अत्यावश्यकता’ या विषयावर ही परिषद घेण्यात येत असून १४ ते १६ डिसेंबर असे तीन दिवस ही परिषद चालणार आहे. या परिषदेसाठी अमेरिका, युरोप आणि दक्षिण आशियातील प्रतिनिधी सहभागी होणार असून येथील तज्ञ प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने उपस्थितांचे मार्गदर्शन करणार आहेत. तर देशभरातील ६०० पेक्षा जास्त प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा. रविंद्र जायभाय यांनी केले आहे. यावेळी भूगोल विभागाचे प्रमुख प्रा.सुधाकर परदेशी उपस्थित होते.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप