“अनिल परब नटवरलाल” किरीट सोमय्या यांची टीका
मुंबई, १ फेब्रुवारी २०२३ : म्हाडा येथील कार्यालयाबाबत किरीट सोमय्यांचे सर्व आरोप खोटे असून सोमय्या तोडांवर आपटले, असा आरोप अनिल परब यांनी केला होता. या आरोपाला आता किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या हे काल कल्याण येथे आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी अनिल परब यांना पुन्हा आव्हान दिलं. “कार्यालय म्हणून कोण ही जागा कोण वापरत होतं? अनधिकृत जागेची कुणाची मालकी असते का?”, असा सवाल उपस्थित केला. म्हणून म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांना एमआरटीपीवर खटला दाखल करा, असे सांगितले आहे. अनिल परब जगाला मुर्ख समजतात का? तिथे अनधिकृत बांधकाम कुणी केले होते? ही जागा कुणी वापरली? याचा तपास होणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.
“जून २०१९ मध्ये अनिल परब यांना म्हाडाने नोटीस दिली होती. त्यांना जाग यायला ३६ महिने लागले? इसका हिसाब तो लेकर रहेंगे. हेच नटवरलाल दापोलीच्या साई रिसॉर्टमध्ये माझा काय सबंध आहे? असा सवाल उपस्थित करत होते. पण आता नटवरलालवर सहा गुन्हे दाखल झाले आहेत. परब तुम्ही घोटाळ्याच्या पैशांनी जेवढे रिसॉर्ट बांधले, कार्यालयांचे गाळे बांधले, या सर्वांचा हिशोब द्यावाच लागणार”, असे आव्हानच किरीट सोमय्या यांनी दिले.
शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रे गांधीनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या अवैध बांधकामाविरोधात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आज (मंगळवारी) हातोडा चालविण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच हे बांधकाम पाडण्यात आलं. बांधकाम पाडल्यानंतर सोमय्या म्हणाले होते की, “अनिल परब यांनी काही वर्षांपूर्वी वांद्रे पूर्वतील इमारत क्रमांक ५७-५८ मधल्या म्हाडाच्या जागेवर अनाधिकृत कार्यालय बांधलं होतं. ते कार्यालय तोडण्यात आलं. २०२१ मध्ये लोकायुक्तांच्या सुनावणीत हे कार्यालय पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर मातोश्रींचा दहा हातांचा आशीर्वाद असल्याने ही इमारत तोडायला थोडा उशीर झाला”, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली होती
अनिल परब यांनी काल (मंगळवार, ३१ जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. संबंधित कार्यालयाच्या बाबतीत कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं स्पष्ट केलं. १९६० साली या म्हाडाच्या इमारती बांधल्या गेल्या. मी आज माजी मंत्री म्हणून नाही, तर या म्हाडाच्या इमारतीचा एक रहिवासी म्हणून बोलतोय. या इमारतीत माझं लहानपण गेलं. इथेच मी मोठा झालो. मी आमदार झालो तेव्हा इथल्या लोकांनी मला सांगितलं की आपलं जनसंपर्क कार्यालय इथेच राहू द्या. सोसायटीची जागा तुम्ही वापरा, आमची हरकत नाही. त्यामुळे ही जागा मी वापरत होतो. पण सोमय्यांनी याबाबत तक्रार करून कार्यालय तोडण्याची मागणी केली. त्यावर म्हाडाने मला नोटीस दिली. मी तिथे सांगितलं की ही जागा माझी नाही, सोसायटीची आहे. माझा या जागेशी संबंध नाही. त्यानंतर म्हाडाने नोटीस मागे घेतली.