जातीविरहित समाजाची निर्मिती करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली – डॉ. सुरेश गोसावी
पुणे, ०६/१२/२०२३ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती अंतासाठी खूप मोठा संघर्ष केला. त्यांच्या स्वप्नातील जातीविरहित समाजाची निर्मिती करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी श्रीमती चारूशिला गायके, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचे जतन, संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबादारी असल्याचेही डॉ. गोसावी यावेळी म्हणाले. तसेच आधुनिक भारत घडविण्याच्या प्रक्रियेत बाबासाहेबांचे महत्त्वाचे स्थान होते. त्यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू बनवून राज्यघटनेत प्राण ओतले, असे मत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थितांनी बुद्धवंदनेने बाबासाहेबांना अभिवादन केले. या कार्यक्रमाला सिनेट सदस्य, अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव यांनी केले.