वादग्रस्त वक्तव्ये अंगलट! अमोल मिटकरींची सहा महिन्यातच ‘मुख्य प्रवक्तेपदावरुन’ उलचबांगडी

मुंबई, १८ जानवारी २०२४ : राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अमोल मिटकरी कायम वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांची अजित पवारांनी मुख्य प्रवक्तेपदावर नियुक्ती केली होती, पण त्यांनी प्रवक्तेपदावरून वक्तव्य करताना त्यांच्या गटाचेच जास्त नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांची नियुक्ती केली आहे. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीची बंडाळीनंतर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे महिला प्रदेशाध्यक्षपदी तर अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. अवघ्या सहा महिन्यांच्या आत त्यांचे मुख्य प्रवक्ते पद काढून घेण्यात आल्याने त्यांना वादग्रस्त वक्तव्ये भोवल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मिटकरी यांनी मात्र ही कारवाई नसल्याचे म्हणत आपण आजही पक्षाचे प्रवक्ते असल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, आपल्याकडून गैरसमज होत आहे. मला पक्षाने दणका वगैरे काही दिलेला नाही. मागच्या वेळी फक्त प्रवक्ता म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आमच्या पक्षाचे एकूण सात प्रवक्ते असून उमेश पाटील हे आता मुख्य प्रवक्ते आहेत. मुख्य प्रवक्ता हा मुंबईत किंवा पुण्यात राहणारा असावा, मी अकोल्यात राहतो. तिथून राजकीय घडामोडी आणि इतर घटनांवर तातडीने भाष्य करणे शक्य होत नाही. पक्षाशी योग्य समन्वय साधता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. यानंतर मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचे मिटकरी यांनी अभिनंदनही केले.

याबाबत बोलताना पाटील यांनीही मिटकरी यांच्यावर ही कारवाई नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आपल्याकडून गैरसमज होत आहे. आमच्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदी अद्यापपर्यंत नियुक्तीच झालेली नव्हती. ज्या काही नियुक्त झाल्या होत्या त्या पक्षाच्या प्रवक्तांच्या नियुक्ती झाल्या होत्या. मुख्य प्रवक्ते एक स्वतंत्र पद आहे. ते प्रमुख पद आहे. यापूर्वी नवाब मलिक हे या पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते. पण त्यांच्या वैद्यकीय आणि इतर अडचणीमुळे ते सध्या पूर्णवेळ कार्यरत नाहीत. त्यांचे जे पद होतं ते पक्षामध्ये रिक्त होते, त्या मुख्य प्रवक्ते पदी आज सुनील तटकरे आणि अजित दादा यांनी माझे नियुक्ती केली आहे. मी, अमोल मिटकरी, आनंद परांजपे किंवा सूरज चव्हाण असे आमचे सात जण प्रवक्ते आजही कायम आहेत. ते पक्षाच्या प्रवक्ता पॅनलमध्ये काम करणार आहेत. त्या सर्व प्रवक्ता पॅनलचा प्रमुख म्हणून ‘मुख्य प्रवक्ता’पदी वर्णी लागली आहे, असेही त्यांनी सांगितले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप