चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे सनियंत्रण
पुणे, 16 फेब्रुवारी 2023:- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक अंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी पथक स्थापन करण्यात आले असून उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून संकल्प सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उमेदवारांचा निवडणूक खर्च आदी अनुषंगाने माहिती घेत असून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्च तपासणी कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत. खर्च निरीक्षक संकल्प सिंग यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक खर्च लेख्याचे पाहिले निरीक्षण १५ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाले असून २० व २४ फेब्रुवारी रोजी पुढील खर्च लेखा निरीक्षण सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात येणार आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रूपये इतकी आहे. मतदार संघामध्ये एकूण २८ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार नोंदवहीत उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदला जातो.
इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. लेखा अधिकारी इलाही शेख आणि त्यांच्या पथकाकडून हे काम केले जात असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक म्हणून आयकर अधिकारी प्रकाश हजारे यांची नेमणूक करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.