काँग्रेस शेवटच्या दोन दिवसात गांधींना प्रचारात आणणार – चंद्रकांत पाटील यांची टीका
पुणे, १८ फेब्रुवारी २०२३ ः कसब्याची निवडणूक ही आपल्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने ती जिंकायचीच आहे, विधानसभेत कायदे केले जातात, राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता असल्याने तेथे भाजपचाच आमदार गेला पाहिजे. शेवटच्या दोन दिवसात काँग्रेस तुमच्या कडे ‘गांधी’ घेऊन प्रचारात येतील. त्याला तुम्ही नाही म्हणत भाजपलाच मतदान करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ लोकजनशक्ती पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटील बोलत होते. लोकजनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय अल्हाट, सरचिटणीस अमर पुणेकर, के. टी. पवार, प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, कसब्याची निवडणूक ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होत आहे. यामध्ये रासने यांना निवडून द्यायचे असल्याने आजचा मेळावा आहे. मोदी हे गरिबीत जगले आहेत, पण गांधी कुटुंब सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, श्रीमंतीमध्ये जगले आहेत. मोदी तुमच्या आमच्या सामान्य आहेत. मोदींमुळे आपण कोरोना काळात आपण जिवंत राहिलो आहोत. त्यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण केल आणि अनेक देशांना लस पुरवलीही.
पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, ही निवडणूक रासने विरोध धंगेकर नाही. तर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस देशात नाही टिकली तर गल्लीत काय टिकणार, काँग्रेसला साधे विरोधी पक्ष नेतेपदही मिळवता आलेले नाही. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आजारी बापट यांना प्रचारात आणल्याबद्दल टीका केली, पण शरद पवार हे आजारी असूनही फिरत आहेत. आम्हाला बापट साहेबांचा अभिमान आहे. गेल्या तीन आठवड्यात गिरीश बापट यांना मी २३ वेळा भेटलो,बोललो आहे. निवडणूक कशी जिंकायची याची चर्चा केली,मार्गदर्शन घेतलं आहे.
मनसे नेत्यांची भेट
मनसेने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपकडून मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी सुरू केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दीपक पायगुडे, बाळा शेडगे, सुशीला नेटके, अजय शिंदे, प्रल्हाद गवळी यांची भेट घेऊन चर्चा केली. हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर ही भेट घेतली असून, मनसे भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असे चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे कसबा विभाग अध्यक्ष गणेश भोकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप