‘महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, 11 सप्टेंबर 2023 :- राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार संबंधित भागातील उपकेंद्रांचे प्रलंबित काम पूर्ण करणे, उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे आणि नवीन उपकेंद्र मंजूर करणे आदी कामे हाती घेऊन प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीआज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात माढा, करमाळा, अकोले, अहमदनगर, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, औंढा, बारामती आदी तालुक्यांमधील ‘महावितरण’शी संबंधित प्रलंबित कामांचा तसेच नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीस आमदार नितीन पवार, डॉ. किरण लहामटे, देवेंद्र भुयार हे प्रत्यक्ष तर संजय शिंदे, दिलीप मोहिते पाटील, दिलीप बनकर, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, मुख्य अभियंता प्रवीण परदेशी आदी अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्यात सद्यस्थितीत सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत (RDSS) वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. याअंतर्गत नवीन उपकेंद्र उभारणे, उपकेद्रांची क्षमतावाढ, नवीन उच्चदाब वाहिन्या, नवीन वितरण रोहित्रे, विद्यमान वितरण रोहित्रांची क्षमतावाढ यासारखी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली बहुतांश कामे यामधून पूर्ण करण्यात यावीत.

माढा तालुक्यातील पडसाळी, अरण, भेंड, वरवडे, परीते, जाधववाडी येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. घोटी व बावी येथे नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथे नवीन आणि माळशिरस तालुक्यातील जांबूड येथे अतिरिक्त उपकेंद्र मंजूर करण्यात आले. करमाळा तालुक्यातील वांगी येथे नवीन उपकेंद्र देण्यात येणार आहे, तर रायगाव येथील उपकेंद्राबाबत आकस्मिक निधीच्या उपलब्धतेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

खेड तालुक्यातील चिखलगाव व वाकी येथे नवीन उपकेंद्र तर कडूस येथे अतिरिक्त रोहित्र उभारणी करण्यात येणार आहे. कडूस येथे २२०/३३ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राच्या तांत्रिक प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरु आहे. मोर्शी तालुक्यातील तिवसाघाट व गणेशपूर (लिंगा) येथे नवीन उपकेंद्र बसविण्यासह रोहित्रांची क्षमतावाढ करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील आसेगाव व मुडी, औंढा तालुक्यातील पोटा खुर्द येथे नवीन उपकेंद्र केले जाईल. तशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे महावितरणचे नवीन प्रशासकीय कार्यालय करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बारामती तालुक्यातील करंजे व कऱ्हावागज, इंदापूर तालुक्यातील निरवांगी, केडगाव विभागातील बोरीआंदी, कानगाव, सासवड विभागातील दिवे, न्हावी, शिवतक्रार (निरा) याठिकाणची उर्वरित कामे करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

अकोले तालुक्यातील मवेशी व पाडाळणे, संगमनेर तालुक्यातील घारगाव व नांदूर खंदमाळ, कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव, राहाता व चासनळी, कळवण तालुक्यातील कनाशी या उपकेंद्रांचा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. या उपकेंद्रांचा समावेश सुधारित वितरण क्षेत्र योजनेत करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.