महिला आयोगाने बजावली चित्रा वाघ यांना नोटीस

पुणे, ६ जानेवारी २०२३ : गेल्या चार दिवसांपासून उर्फी जावेद चे अंगप्रेशन करणारे कपडे आणि चित्रा वाघ यांची भूमिका यावरून राज्यभर वाद सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेद अश्लिता निर्माण करत असल्याने तिच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आघाडी केली होती. मात्र आयोगाने उलट चित्र वाघ यांना नोटीस पाठवून या वादात आणखीन एक विचित्र स्थिती निर्माण करून ठेवली आहे.

मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेद हिच्यावरुन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आमनेसामने आल्या आहेत. चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उर्फीच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणा-या महिला आयोगाने ट्वीटरवरील बातमीवरून मराठी वेबमालिका ‘अनुराधा’च्या अश्लील पोस्टरची स्वाधिकाराने दखल घेत तातडीने अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस बजावली. मात्र आयोगाला उर्फीचे कृत्य व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग वाटते, यावरून आयोगाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

आता यावर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे सांगितले आहे. तसेच महिला आयोगातर्फे चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.