पुरावे न सापडल्याने प्रवीण दरेकरांना क्लीन चीट, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल
मुंबई, २ डिसेंबर २०२२: मुंबै बँक घोटाळा प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना क्लीन चीट मिळाली आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर दरेकरांना दिलासा मिळाला आहे. काही महिन्यापूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आला होता. आता मुंबईच्या गुन्हे शाखेच्या अहवालामुळे दरेकर यांना क्लीन चीट दिली आहे.
२०१५ च्या या आर्थिक प्रकरणात कुठलेही पुरावे न सापडल्याचा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिला आहे. ‘या प्रकरणात इतकी वर्षं तपास सुरू आहे त्यामुळे कस्टडीची गरज नाही,’ असं मत हायकोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन देताना नोंदवलं होते. या प्रकरणी अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे आदेशही हायकोर्टाने त्यावेळी दिले होते.
2010 पासून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावर असलेल्या प्रविण दरेकर यांचा संचालक असण्याचा मार्गही अडवला गेला होता. त्यामुळे ते स्वत: अध्यक्षपदासाठी उभे राहू शकले नव्हते. पण त्यांनी पुढे केलेल्या भाजपच्या प्रसाद लाड यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आणि दरेकरांचं या प्रतिष्ठेच्या बँकेवर असलेलं दशकभराचं वर्चस्व संपुष्टात आलं.
बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अगोदर झाली. पण त्यापूर्वी दरेकर यांच्या संचालकपदावरुन वाद निर्माण झाला होता. दरेकर यांच्या या बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येण्यावरून हा वाद होता.
जेव्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली तेव्हा दरेकर यांनी त्यांचं ‘सहकार पॅनल’ उभं केलं. त्यामध्ये कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीशी संबंधित उमेदवार होते. एकूण 21 संचालकांच्या या मंडळातले 17 संचालक हे दरेकरांच्या सहकार पॅनलचे बिनविरोध निवडून आले. उरलेल्या चार जागांवर जी निवडणूक झाली त्यातही त्यांच्याच पॅनलचे उमेदवार जिंकले.