प्यार की दुकान म्हणणाऱ्या काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मुंबई, १७ जून २०२३ ः भाजप म्हणजे नफरत की दुकान आणि काँग्रेस म्हणजे प्यार की दुकान असा प्रचार काँग्रेसचे नेते राहूल गांधी करतात. मात्र आज काँग्रेसमध्ये धक्कादायक घटना घडली. मुंबईत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. एका बैठकीदरम्यान दोन गट आपसात भिडले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना खुर्च्यांनी मारहाण केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.
‘एएनआय’च्या वृत्तानुसार, शनिवारी मुंबईत युवक काँग्रेसच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला युवक काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात एक गट आक्रमक झाला. यावेळी युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्षांनी कुणाल राऊत यांना बदलण्याची मागणी.

या मागणीनंतर कुणाल राऊत यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी सभागृहातील खुर्च्यांनी एकमेकांवर हल्ला केला. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत ही मारहाण झाली आहे. या घटनेत सभागृहातील अनेक खुर्च्या मोडल्या आहेत. कार्यकर्त्यांना दुखापत झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.