पुणे विद्यापीठ चौकात सोमवारपासून चक्राकार वाहतूक व्यवस्था

पुणेदिनांक ०९ फेब्रुवारी २०२३आचार्य आनंदऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येत्या सोमवारपासून चक्राकार वाहतूक व्यवस्था राबविण्यात येणार आहे. तसेच येथील वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूकीला सुरळीत गती मिळावीया हेतूने विद्यापीठ चौकाला सिग्नलमुक्त ठेवण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३ च्या वतीने या चौकात दुमजली उड्डाणपूलाचे (डबल डेकर) नियोजन असून त्याकरिता अतिरिक्त बॅरिकेडिंग करावे लागणार आहे. यामुळे होऊ शकणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचे नियोजन म्हणून ही चक्राकार वाहतूक व्यवस्था राबविण्याची योजना आहे. सोमवारपासून प्रायोगिक तत्वावर ती राबविली जाणार असूनत्याचे अपेक्षित परिणाम बघून पुढील निर्णय घेतले जातीलअशी माहिती पुणे वाहतूक पोलिस विभागाच्या समन्वयाने पुणे मेट्रो लाईन ३ च्या वाहतूक नियोजन अधिकाऱ्यांनी कळविली आहे.

नवीन नियोजित वाहतूक व्यवस्थेनुसार बाणेर रस्ता व औंध रस्त्याने विद्यापीठ चौकात येणारी वाहने ही सिग्नलमुक्त व्यवस्थेचा लाभ घेऊन झटकन शिवाजीनगरकडे डाव्या लेनने जाऊ शकतील. त्याचवेळी विद्यापीठ चौक येथे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा यादृष्टीने आवश्यक तो वेळ देण्यात येणार आहे.

गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाण्याकरीता सध्या कॉसमॉस बँक येथे यु टर्न देण्यात आला होतासदरचा यु-टर्न बंद करून सेनापती बापट रस्ता जंक्शन येथून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

तसेच सेनापती बापट रस्त्याने (चतुःश्रृंगी मंदिर येथून) विद्यापीठ चौकाकडे येणारी सर्व वाहतूक सेनापती बापट रस्ता जंक्शन येथून डावीकडे वळून सरळ पाषाण रस्त्याकडे वळविण्याचे नियोजन आहे.

 

नवीन चक्राकार वाहतूक व्यवस्थेनुसार गणेशखिंड रस्त्याने सरळ औंधकडे जाण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गाचा वापर करता येणार आहे:

मार्ग १: गणेशखिंड रस्त्याकडून व सेनापती बापट रस्त्याकडून पुणे विद्यापीठ, चतुःश्रृंगी पोलिस स्थानककेंद्रीय विद्यालय आणि कस्तुरबा गांधी वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांकरीता पाषाण रस्त्याने सिंहगड गेट (पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय) येथून उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जाता येईल.

मार्ग २: पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटीपाषाण रोड जंक्शनउजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी. बाणेर रोड जंक्शन येथून उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जाता येईल.

मार्ग ३: गणेशखिंड रस्त्याकडून व सेनापती बापट रस्त्याकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांकरीता पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी. पाषाण रोड जंक्शनउजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी. बाणेर रोड जंक्शन डावीकडे वळून बाणेर फाटा उजवीकडे वळून सर्जा हॉटेल कॉर्नर डावीकडे वळून क्रोमा मॉल रस्त्याने किंवा बाणेर फाटा उजवीकडे वळून आय.टी.आय. रस्त्याडने परिहार चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.

गणेशखिंड रस्त्यावरून विद्यापीठ चौकामार्गे आपल्या इच्छितस्थळी जाणे नागरिकांना सुकर व्हावे व वेळेची बचत व्हावी याकरीता ही चक्राकार आणि सिग्नलमुक्त व्यवस्था सुचविण्यात आलेली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला आजवर नागरिकांकडून उत्तम सहकार्य मिळाले असूनयापुढेही ते कायम मिळत राहावेअसे आवाहन पुणे मेट्रो लाईन ३ च्या विकसकांकडून करण्यात आले आहे.