मुख्यमंत्री शिंदेचा अजित पवार अन् ठाकरेंना धक्का
कर्जत, २ सप्टेंबर २०२४ ः कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटासह ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. कारण दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात तसेच मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश झाला. कर्जत खालापूरमधील राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष हनुमंत पिंगळे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी महायुतीतील नेत्यांवरच गंभीर आरोप केला. “महायुतीतील घटक पक्षातील काही नेते आपलं आमदार पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र आमचे शिवसैनिक आमदार आणायला सक्षम आहेत”, असं महेंद्र थोरवे म्हणाले. “घटक पक्षांकडून चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्याचं काम सुरू आहे”, असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला. “आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमचा शिवसेना पक्ष सज्ज झाला आहे, असंही आमदार थोरवे म्हणाले. जोपर्यंत माझा शिवसैनिक जिवंत आहे, तोपर्यंत या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत राहील”, असं आमदार महेंद्र थोरवे म्हणाले.
महेंद्र थोरवे यांच्याकडून राष्ट्रवादीवर सडकून टीका
महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गटावर मोठा आरोप केला होता. महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावरच निशाणा साधला होता. “राष्ट्रवादी म्हणजे विश्वासघात करणारी पार्टी, जिल्ह्याचं नेतृत्व करणारेही विश्वासघातकी आहेत”, अशी टीका महेंद्र थोरवे यांनी केली होती. त्यावर सुनील तटकरे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. “महेंद्र थोरवे माझ्यासाठी दखल घेण्याचं पात्रतेचे नाहीत, मला काही फरक पडत नाही”, असं सुनील तटकरे म्हणाले होते.
महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यात वाद काय?
महेंद्र थोरवे कर्जतचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारेही इच्छुक आहेत आणि सुधाकर घारेंना तटकरे पुढे करत असल्याचा आरोप थोरवेंचा आहे. “शिवसेनेकडून निवडून आल्यावर शिंदे गटात गेले, विश्वासघातकी थोरवेच”, असं सुधाकर घारे म्हणाले आहेत. त्याच घारेंना सुनील तटकरे पुढे करत असल्याचा थोरवे यांचा दावा आहे.