पुणे महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे अप्रत्यक्ष संकेत

पुणे, १५ मे २०२५ : महापालिकेच्या निवडणुका राज्यात सत्ताधारी असलेले तीनही पक्ष महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न आहे. मात्र शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे. त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी वेगळे लढू असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक भाजप महायुती आयोजित स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे.

राज्यातील महापालिकांचे आयुक्त तसेच अ वर्ग नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांची परिषद यशदा येथे झाली. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणुका वेळेत घेण्याबाबत कोणतीही अडचण सध्या दिसत नाही. ज्या भागात पावसाची अडचण असेल तेथे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार एकमेकांशी चर्चा करून काही दिवसांची वेळ घेईल.

निवडणुका या तीनही पक्षांनी महायुतीत एकत्रच लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे, त्यांनीही सहा ते सात वर्षे तयारी केलेली असते, त्यांना दुखवून चालत नाही. अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढू जे निवडून येतील विजयानंतर ते पुन्हा एकत्रच येतील. याबाबत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांशी चर्चा झाली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

एकमेकांवर टीका करणार नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. तेथे त्यांचे काम असते. त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल. मात्र हे करताना एकमेकांवर कोणतीही टीका केली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. ज्या पक्षाचा उमेदवार तुल्यबळ असेल त्याचा विजय निश्चित आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकत्र येऊ, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.