गाडीला आग लागताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ही कृती
मुंबई, १३ सप्टेंबर २०२२: पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) विलेपार्ले येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाच्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना घडली तेव्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वाहनांचा ताफाही याच रस्त्यावरून जात होता. खरे तर मुख्यमंत्री शिंदे हे आपला औरंगाबाद दौरा अटोपून मुंबईत परतले होते. यानंतर ते येथील विमानतळावरून आपल्या घरी जात होते. मात्र, त्यांना रस्त्यातच एका तरुणाच्या कारने पेट घेतल्याचे दिसले. यानंतर, त्यांनी काहीही विचार न करता आपला ताफा थांबवत तरुणाची विचारपूस केली.
राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, हे मुख्यमंत्री असले तरी, त्यांच्यातील एक सामान्य कार्यकर्ता वेळोवेळी दिसून येतो.
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून ते सातत्याने राज्याच्या काणाकोपऱ्याचा दौरा करत, लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांनी जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ते सातत्याने जनतेच्या मदतीसाठी तत्पर असल्याचेही अनेक वेळा दिसून आले आहे. अशीच काहीशी घटना विलेपार्ले येथे बघायला मिळाली. येथे भर रस्त्यात एका कारने अचानक पेट घेतला. हे पाहून मुख्यमंत्री शिंदे क्षणाचाही विलंब न करता, आपला ताफा थांबवत संबंधित कारचालकाच्या मदतीसाठी धावल्याचे दिसून आले.
ही घटना घडली तेव्हा संबंधित भागात पाऊसही सुरू होता. मुख्यमंत्री शिंदे भरपावसात गाडीतून खाली उतरले. त्यांनी संबंधित तरुणाला त्याचे नाव विचारले. यानंतर त्या तरुणाला धीर देत, जीव वाचला हे महत्त्वाचे, गाडी आपण नवी घेऊ. काळजी करू नकोस, असे मुख्यमंत्री म्हणाले. एवढेच नाही, तर पुन्हा गाडीत बसताना, संबंधित तरुणाला जळत्या गाडीजवळ न जाण्याचा सल्लाही दिला.