सप्टेंबर महिन्यात राज्यात सत्ता बदल – विजय वडेट्टीवार यांचा दावा

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३: काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्तेबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी किती दिवसात राज्यातील सत्तेत बदल होतील, हे सांगितले आहे. हे सांगताना आमचं सरकार येणार नाही, मात्र मुख्य खुर्चीवरील व्यक्तीत बदल होईल, असं सूचक वक्तव्य केलं. ते शनिवारी (१९ ऑगस्ट) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “कधी पुण्यामधील उपमुख्यमंत्री बैठकीला दांडी मारतात, तर कधी नागपूरमधील उपमुख्यमंत्री दांडी मारतात. तिघेही कधी एकत्र येत नाहीत. दोन्ही उपमुख्यमंत्री आले की मुख्यमंत्री येत नाहीत. हे सगळं आलबेल नाही. हा सगळा तमाशा महाराष्ट्रातील जनतेला दिसतो आहे. यांनी संपूर्ण महाराष्ट्राची पत घालवली आहे.”

सत्तेच्या हव्यासाने महाराष्ट्रात वाट्टेल ते सुरू आहे. येणाऱ्या १५-२० दिवसात महाराष्ट्रात काय बदल होईल हे जनता बघेल. यात मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल. सप्टेंबर २०२३ हा महिना या राज्यातील सत्ताबदलाचा असेल,” असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

“मी ठासून सांगतो की, मुख्य खुर्ची बदलेल”

“सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल, असं आम्ही म्हणत नाही. मात्र, मी ठासून सांगतो की, मुख्य खुर्ची बदलेल,” असंही विजय वडेट्टीवारांनी नमूद केलं.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप