चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
चंद्रपूर, ३० मे २०२३ : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार, चंद्रपूरचे लोकप्रतिनिधी बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना अत्यंत दुखद घटना आहे. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी दीड वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे, आज ३० मे रोजी दुपारी २ वाजेपासून ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ३१ मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. ४८ वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्का करणारा प्रवास केलाय.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना २००९ साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.
२०१४ पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला.
राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.
लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला.
लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका , मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरलेत.
अशातच शुक्रवार, दिनांक २६ मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांची मंगळवार ३० मे रोजी पहाटे प्राणज्योत मालवली. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड पिता नारायण धानोरकर यांचे निधन झाले. आता पुन्हा अचानक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.