पुण्याची सुभेदारी चंद्रकांत पाटीलांकडेच
पुणे, २५ सप्टेंबर २०२२: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारने जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्र्याविना ठप्प झालेली कामे व लांबणीवर पडलेले धोरणात्मक निर्णयाचे विषय निकाली लागण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकार पडून राज्यात एकनाथ शिंदे गट व भाजप युतीचे सरकार आले आहे. या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप झाले. पण पालकमंत्र्याबाबत निर्णय होऊ शकलेला नव्हता. भाजपची यापूर्वी राज्यात सत्ता असताना गिरीश बापट यांच्याकडे पालकमंत्री होते, पण ते खासदार झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे काही काळ पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यामुळे याही वेळेस त्यांच्याकडे पालकमंत्रीपद जाणे अपेक्षीत होते. पण हा निर्णय घेण्यास विलंब होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद जाणार असल्याचीही चर्चा भाजपमध्ये सुरू होती. मात्र, अखेर चंद्रकांत पाटील हेच पुण्याचे पालकमंत्री होणार असणार हे आज स्पष्ट झाले.
विरोधीपक्षनेते अजित पवार पालकमंत्री असताना दर शुक्रवारी आढावा बैठका होत होत्या. गेले दोन अडीच महिन्यापासून ही बैठक झालेली नसल्याने पुणे शहर, जिल्हा, पिंपरी-चिंचवड मधील महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. पुणे शहरातील पे अँड पार्क, मेट्रोच्या विस्तारीकरणाचा आढावा, बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास, मिळकतकराची ४० टक्के सवलत व थकबाकी वसुली, पाणी, कचरा समस्या, समाविष्ट गावातील विकास कामे याबाबत चर्चा होऊन त्यास गती देणे आवश्यक आहे.
कोट
‘‘पुणे जिल्ह्यातील संघटन मजबूत करणे, रेंगाळलेली विकास काम करून लोकांमध्ये सरकारबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी पालकमंत्रीपदाची जबाबदारी मला दिली आहे. यास मी नक्की न्याय देईल. प्रत्येक सरकारच्या काळात सहमती होऊन निर्णय घेण्यास विलंब लागत असतो.’’
चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, पुणे
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत-परभणी,
उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर