मायचा लाल योजना बंद करू शकत नाही – एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका
परंडा, १४ सप्टेंबर २०२४ः मला मुख्यमंत्री झाल्यावर इतका आनंद झाला नव्हता तितका आज या कार्यक्रमाच्या निमीत्ताने आनंद होत आहे. कारण मी आमच्या टीमचा कॅप्टन असलो तरी आता मी आपला लाडका भाऊ झालो आहे. त्यामुळे आता आपल्याला प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार, कुणी मायचा लाल ही योजना बंद करू शकत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे महिला सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. बहिण लाडकी आणि विरोधकांच्या मनात भरली धडकी असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार घणाघात केलाय. यावेळी बोलताना शिंदे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सभेला उपस्थित नसले तरी त्याबद्दल वेगळी चर्चा करायची गरज नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आल्याने फडणवीस येऊ शकले नाहीत. तर, अजित पवार आपल्या नियोजीत कार्यक्रमाला गेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो आम्ही लोक १८-१८ तास काम करणारे लोक आहोत. या पंचवार्षीकमधील सुरूवातीचे अडीच वर्ष वाया गेले अशी टीकाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली.
बॅंकेत पैसे आले तर विरोधक म्हणाले लवकर काढून घ्या, अन्यथा सरकार पैसे काढून घेईल. अरे विरोधकांनो तुम्ही पैसे काढणारे आहेत तर आम्ही पैसै देणारे आहोत. आज आम्ही मुलींसाठी वेगवेगळ्या योजना केली आहे. जन्म झाला की 5 हजार मुलीसाठी मिळतात. तर ती १८ वर्षाची झाली की तिला आपण १ लाख रुपये देणार आहोत. त्यामुळे आम्ही महिलांसह मुलींसाठीही काम करत आहोत असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले आहेत.
घरी बसून सरकार चालत नाही, फेसबूकवरुन सरकार चालत नाही. त्यासाठी शेताच्या बांधावर जाऊन काम करावं लागत असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर हे सरकर म्हणजे एकबार कमिंटमेंट किया तो खुद की ही नही सुनता असं आहे. त्यामुळे आम्ही जे काही अश्वासन दिली आहेत ते पूर्ण करणार आहोत असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपस्थित होते.