भाजप देणार अजित पवार गटाला ९० जागा
मुंबई, ६ जुलै २०२३ : भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या १३ जागा मिळणार असल्याची माहिती या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अगोदरच आमचापक्ष विधानसभेच्या ९० जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या ५३ आणि पाठिंबा दिलेल्या दोन अपक्ष आमदारांचे विधानसभा मतदारसंघ गृहीत धरले आहेत. हे ५५ विधानसभा मतदारसंघ कायम राहणार असून उर्वरित ३५ विधानसभा मतदारसंघ हे बहुतांश काँग्रेसच्या समोरील असतील अशी रणनीती आखल्याची
माहिती आहे.
विदर्भ आणि शहरी भागात भारतीय जनता पक्षाला झुकते माप असेल तर, ग्रामीण भागात अजित पवार गटाला मतदारसंघ वाटपात प्राधान्य असेल अशी रणनीती आहे. तेरा लोकसभा मतदारसंघातही विद्यमान पाच खासदारांचे मतदारसंघ गृहीत धरून उर्वरित आठ लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस आणि एमआयएमकडे असलेल्या मतदारसंघाचा सहभाग असेल, असे या नेत्याचे मत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर या ‘एमआयएम’कडील एकमेव लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाला उमेदवारी मिळेल असे संकेत आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत नवीन आणि तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही संबंधित नेत्याने स्पष्ट केले.
काँग्रेसचे मतदारसंघ ‘टार्गेट’
अजित पवार गटाला ९० विधानसभा मतदारसंघांत
संधी मिळणार असून यापैकी ३५ ते ४० मतदासंघांत
त्यांची लढत थेट काँग्रेसच्या उमेदवारांसमोर होईल
असे डावपेच असल्याचेच वरिष्ठ नेत्याने सूचित केले. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे चित्र असून, या महायुतीचा सामना काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या उमेदवारांसोबत असेल असे या माहितीवरून स्पष्ट होते.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप