टोलमाफाची घोषणा करणार्यां भाजपने टोलमाफीया निर्माण केले – नाना पटोले

नाशिक, ९ ऑक्टोबर २०२३: राज्यातील टोलवरील वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही असं वक्तव्य केलं आणि या वादाला अधिकच धार चढली. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या वक्तव्याची शहानिशा करणार तसेच टोलनाक्यावर जर कुणी अडवलं तर टोलनाकाच जाळून टाकण्याचा इशारा दिला. त्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावर राज्य सरकारची कोंडी करायला सुरुवात केली असून काँग्रेस प्रदेशााध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर भाष्य केले आहे. काँग्रेस पक्ष हा टोल व्यवस्थेच्या विरोधातच आहे असे पटोले म्हणाले.

काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीनिमित्त पटोले नाशिकमध्ये होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.

पटोले म्हणाले, २०१४ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाने जे खोटं आणि दिशाभूल करणारे स्वप्न जनतेला दाखवले होते त्यात टोलमुक्तीचे स्वप्न होते. राज्यात आणि केंद्रात जर भाजपचं सरकार आलं तर टोलमुक्त महाराष्ट्र आणि भारत होणार अशा घोषणा भाजपने केल्या होत्या. टोलमाफिया निर्माण करण्याचे जे टोल लोकांच्या पैशांतून निर्माण झाले त्याही रस्त्यांवर टोल लावून जनतेची लूट करण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. काँग्रेस पक्ष हा सुद्धा टोल व्यवस्थेच्या विरोधात असून पक्षाचा याला विरोध आहे. आमचा देखील टोलमुक्तीला पाठिंबा आहे परंतु, मला राज ठाकरेंच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं नाही असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर पटोले म्हणाले, आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सत्तेचा दुरुपयोग भाजपचं पहिला ब्रीदवाक्य आहे. केंद्र सरकारच्या विरोधात जे बोलेल त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. राष्ट्रवादीने घोटाळा केला असे आरोप करतात आणि नंतर त्यांच्याचं लोकांना मंत्री करतात अशी टीका त्यांनी केला.