“आगामी विधानसभेत भाजपला सर्वाधिक जागा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ३५ टक्के जनतेची पसंती”
मुंबई, १९ जून २०२३: ‘न्यूज एरेना डंडिया’ या संस्थेने कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये केलेल्या पाहणीचे अंदाज बिनचूक ठरले होते. या संस्थेच्या सर्व्हेनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसने बहुमत मिळविले होते. महाराष्ट्राबद्दल केलेल्या पाहणीमध्ये भाजपला आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे १२३ ते १२९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ५५, तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणे अपेक्षित आहे. शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सर्वेक्षणातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सर्वाधिक २१ टक्के लोकांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली आहे. अजित पवार यांना १४ टक्के तर एकनाथ शिंदे यांना १२ टक्के लोकांनी कौल दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ९ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंत केले आहे.
महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली, तर काँग्रेसला सर्वाधिक फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली होणार असली तरी ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळण्याचा अंदाज न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी एकत्र लढली नाही तर काँग्रेसला २८ ते ३० जागाच मिळू शकतील, असा अंदाज आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे गटापेक्षा मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. त्यांना २५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
मुस्लिम समाज एकसंघपणे एआयएमएमआयच्या पाठीशी उभा राहील, असा अंदाज सांगण्यात आलेला आहे, त्यामुळे एआयएमएमआयच्या जागा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.