एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघात भाजपची फिल्डींग
मुंबई, ८ सप्टेंबर २०२२: शिवसेना बंडखोरांना ज्यांच्या नेतृत्वात बंड केले त्या एकनाथ शिंदे यांच्याच मुलाची आता खासदारकी धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आणि याच मतदारसंघात आता भाजपने आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजप आता कल्याण मतदारसंघावर दावा सागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपाच्या ‘मिशन २०२४’ अंतर्गत देशातील १४० मतदारसंघात केंद्रीय नेतृत्वानं विशेष लक्ष देण्याची जबाबदारी मंत्र्यांवर टाकली आहे. त्यात महाराष्ट्रातील १६ मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये, खुद्द शरद पवारांचा बारामती मतदारसंघाबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळे भाजप या मतदारसंघावर दावा करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकूण १६ मतदारसंघापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे लोकप्रतिनिधीत्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मात्र, आता कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेत्यांच्या जागांवर आम्ही का दावा करू? असा सवाल करत फडणवीसांनी कल्याणमधील लोकसभा सीटवर कुठलाही दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. त्यामुळे उर्वरित शिवसेनेच्या जागांबाबतचा निर्णय शिंदे आणि भाजपा एकत्र घेईल, असेही त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत आपले मत व्यक्त केले आहे. शिंदे म्हणाले की, कल्याण डोंबिवलीबाबत सुरू असलेल्या चर्चेची मला माहिती नाही. परंतु आगामी काळातील सर्व निवडणुका आम्ही एकत्र युती म्हणून लढू. शिवसेना-भाजप युती असेल, असे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले असल्यामुळे आम्ही सगळ्या निवडणुका युतीतच लढणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाबाबत भाष्य करताना आणखी स्पष्ट केले की, आता आमच्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ओरिजिनल शिवसेना आहे. त्यांचे जे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्यासोबत आले आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही कशाला दावा करणार? उरलेली शिल्लक सेना असेल तर एकनाथ शिंदे आणि आम्ही ठरवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भाजप चे नेते प्रत्यक्षपणे काहीही म्हणत असले तरी अप्रत्यक्षपणे असे दिसून येते की, कल्याण लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजपचे नियोजन सुरू झाले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर हे येत्या रविवारपासून म्हणजेच ११ ते १३ सप्टेंबर अशा तीन दिवसांच्या कल्याण लोकसभा मतदार संघ दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळेही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांनी भाजपच्या साथीने राज्यात नुकतेच सरकार स्थापन केले आहे. त्यात आता त्यांच्याच मुलाची खासदारकी धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.