भाजपचा दावा मोदींच्या सभेला दोन लाख लोक येणार
पुणे, २७ एप्रिल २०२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन येत्या २९ एप्रिल रोजी वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे सायंकाळी साडे पाचला होणार आहे. या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, राजेंद्र शिळीमकर आदी उपस्थित होते.
पांडे म्हणाले, अनेक वर्षानंतर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून रेसकोर्स याठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून महायुतीच्या चारही उमेदवारांची ही महाविजय संकल्प सभा असणार आहे. १२८ एकरांमध्ये ही सभा होणार असून या सभेला २ लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना , मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत.२१ विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार असल्याचे पांडे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह ३ हजार व्हीआयपी या सभेला उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे ते त्यांना समजेल. कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये. पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे. २२ ठिकाणी एलइडी लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी येण्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी ४ वाजून ३० मिनिटापर्यंत सभेच्या ठिकाणी पोहचावे असे पांडे यांनी सांगितले.