भाजपा ‘मोठा भाऊ’; ही जनतेची भूमिका – चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
सातारा, ०४/१०/२०२३: एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सरकारचे प्रमुख आहेत हे कुणीच नाकारू शकत नाही, परंतु, महायुतीमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार, खासदार आहेत. अधिकाधिक लोकप्रतिनिधी असणारा पक्ष हा मोठा असतो, असा विचार जनता करीत असल्याने महायुतीमध्ये भाजपाची भूमिका ‘मोठा भाऊ’ हीच आहे, असे स्पष्ट मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. २०२४ पर्यंत शिंदे हेच मुख्यमंत्री असतील.
बुधवारी (दि. ४) रोजी त्यांनी सातारा लोकसभा प्रवासादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला श्री बावनकुळे म्हणाले, एनडीए आघाडीत भाजपाने घटक पक्षांना जपण्याचे काम केले. भाजपाकडून घटक पक्षांना जो सन्मान दिला जातो तो कॉंग्रेसमध्ये मिळू शकत नाही. जेव्हा मूळ हिंदूत्वाची युती टिकविण्यासाठी एकनाथ शिंदे भाजपासोबत आले तेव्हा त्यांना न मागता मुख्यमंत्रीपद भाजपाने दिले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, सातारा लोकसभा महायुतीचीच उमेदवार निवडून यावा, असा निश्चय भाजपाने केला आहे. पक्षाचे ‘सुपर वॉरिअर्स’ प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील ६०० घरी पोहचतील व मविआने जनतेत पसरविलेला संभ्रम दूर करतील.
प्रदेशाध्यक्षांच्या प्रवासात प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, अमर साबळे, धैर्यशील कदम, शिवेंद्र राजे भोसले, जयकुमार गोरे, अतुल बाबा भोसले, मदन दादा भोसेले, नरेंद्र पाटील, रवींद्र अनासपुरे, मकरंद देशपांडे, डॉ. प्रियाताई भोसले, विजयाताई भोसले, सुरभीताई भोसले, रामकृष्ण वेताळ, रोहिदास पिसाळ, दीपक ननावरे, विवेक भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
• संवाद, चर्चा अन् मोदी-मोदींचे नारे
प्रदेशाध्यक्षांनी सातारा लोकसभा प्रवासाची सुरुवात ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाने झाली. सातारावासींनी रॅली काढून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. सकाळी सातारा येथे कोरगाव, वाई व सातारा आणि दुपारी कराड येथे कराड उत्तर तथा दक्षिण व पाटण विधानसभा क्षेत्रातील ‘सुपर वॉरिअर्सशी संवाद साधला. सातारा येथे मोती चौक ते जुने मोटार स्टँडपर्यंत तर कराड येथील आझाद चौक ते चावडी चौकपर्यंत ‘घर चलो अभियाना’त सहभागी झाले व नागरिकांशी चर्चा केली. यादरम्यान दोन्ही बाजारपेठांमध्ये मोदी-मोदी नारे लागत होते. श्री बावनकुळे यांच्या स्वागतासाठी सातारा व कराड येथे स्थानिक नागरिकांनी जय्यत तयारी केली होती.
• डेटा तयार करण्याचा अधिकार राज्याला
आरक्षणावर राज्य सरकाराची भूमिका महत्वाची आहे. सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला. हा प्रश्न लवकर निकाली निघेल. जनगणना करण्याचा संपूर्ण अधिकार केंद्र सरकारचा आहे. राज्यांना त्याच्या राज्यातील डेटा तयार करण्याचा अधिकार आहे, ती जनगणना नाही. असा डेटा कधी तयार करावा हे ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.
• अजित पवार नाराज नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज नाहीत, ते स्पष्टवक्ते आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा होणार, हे ठरल्यानुसारच झाले आहे, त्यास राजकीय रंग आणू नये. प्रत्येक पक्षातील नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. यात काही गैर नाही.