काँग्रेसला नांदेडमध्ये मोठा सुरुंग, ५५ माजी नगरसेवका अशोक चव्हाणांसोबत

नांदेड २४ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झालीय. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. या खिंडारमधून काँग्रेसला लागलेली गळती संपायचं नाव घेताना दिसत नाहीय. कारण नांदेडमधील काँग्रेसच्या तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिलाय. काँग्रेस पक्षाला गळतीचं लागलेलं हे ग्रहण आता तरी कमी होईल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आपण कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसून कुणालाही सोबत नेणार नाही, असं म्हटलं होतं. पण आता त्यांच्या नांदेड मतदारसंघातील तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

नांदेड महापालिकेच्या मागील निवडणुकीत निवडून आलेल्या ८१ पैकी ७३ नगरसेवक हे काँग्रेसचे होते. यापैकी ५५ माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता नांदेडमधील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते भाजपला पाठिंबा देताना दिसत आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे इतर आमदारही अशोक चव्हाण यांना पाठिंबा देतात का ते पाहणं महत्त्वातं ठरणार आहे.

अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते काल पहिल्यांदाच त्यांच्या नांदेड मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. ही गर्दी पाहून अशोक चव्हाण सुद्धा भारावले होते. अशोक चव्हाण यांनी नंतर माध्यमांना प्रतिक्रिया देत सविस्तर भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी नांदेडसाठी आगामी काळात काय काय सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार याबाबत माहिती दिली. “पक्षांतर केल्यानंतर एवढी लोक स्वागताला, मला म्हणणारे माझे चाहते, भाजपमधले आणि काँग्रेसमधून माझ्याबरोबर येऊ इच्छिणारे असे असंख्य कार्यकर्ते होते जे माझ्या स्वागतासाठी मिरवणुकीमध्ये आले होते. आपल्या सोबत असलेला जनसमुदाय ताकद देणार असतो”, अशी भावना अशोक चव्हाण यांनी स्वागतानंतर व्यक्त केली होती.
“नांदेडचा रोड मॅप माझ्या डोळ्यासमोर आहे. नांदेडला खऱ्या अर्थाने एअर कनेक्ट सोबत जोडले पाहिजे. नांदेडमधील सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. पायाभूत सुविधा निर्माण करणे, रेल्वेचे प्रकल्प केंद्राशी निगडित आहेत. त्यांना निधी मिळाला पाहिजे. भरपूर प्रकल्प माझ्या डोळ्यासमोर आहेत. खऱ्या अर्थाने निवडणुकी झाल्या की हे काम करू”, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

“ज्या कार्यकर्त्यांना माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीत यायचं आहे त्यांचे स्वागत आहे. मी कोणालाही जबरदस्तीने माझ्यासोबत या अशी भूमिका घेतली नाही, आणि आजही घेणार नाही”, असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

भाजपाची निवडून आली पाहिजे

“मागच्या वेळेस काँग्रेस आणि भाजप असा लढा झाला आहे आणि त्यावेळेस भाजप निवडून आली आहे. आता ते भाजपमध्ये आहेत त्यामुळे ही जागा भाजपाचे निवडून आली पाहिजे ही माझी भूमिका असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने वाटचाल चालू आहे त्यामुळे लोकांचा कल हा नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे”, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला. तसेच “भाजपमध्ये प्रवेश करायला उशीर झाला असं मला कधीच वाटलं नाही. मी योग्य वेळेस योग्य निर्णय घेतो”, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.