भुजबळांनी भूमिका मांडली पण टोकाचे बोलू नये – वळसे पाटलांनाही खटकलं भुजबळांचं वक्तव्य

पुणे, ११ नोव्हेंबर २०२३: राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. त्यांच्या या भूमिकेवर आता सत्ताधारी गटातील नेते मंडळीही भाष्य करत आहेत. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री दिलीप वळसे पाटील आज पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर वळसे पाटील म्हणाले, भुजबळ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. या मुद्द्यावर टोकाचं कुणीही बोलू नये असं वाटतं. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. परंतु, अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. राज्य सरकार सुद्धा त्याच मार्गाने प्रयत्न करत आहे, असे वळसे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीत काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरील भेटीतील चर्चेवर मात्र वळसे पाटील यांनी अधिक बोलणे टाळले. शरद पवार यांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांत बैठक झाली. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात ही बैठक होती. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तसेच रयत शिक्षण संस्थेत होणाऱ्या बदली संदर्भात किंवा माझ्या नावाच्या बदलासंदर्भात काहीही चर्चा झाली नाही. पवार साहेबांचं मी नेहमीच मार्गदर्शन घेत असतो, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांवरही वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मी अजून गावाला गेलो नाही. 24 ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या विचारांचे सत्तेत आले आहेत. चार ग्रामपंचायती स्थानिक पॅनलच्या तर दोन ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. स्थानिक प्रश्नांमुळे काही ग्रामपंचायतीत थोडा बदल झाला, असे वळसे पाटील म्हणाले.