भरत गोगावलेंनी सांगितला मंत्रीपद हुकल्याचा किस्सा- ‘एक म्हणाला बायकोची इच्छा, दुसर्याला राणेंची भीती मग मी थांबलो’

मुंबई, १७ ऑगस्ट २०२३: राज्यात दीड वर्षांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यांचा पाठिंबा घेत भाजपने तातडीने सरकारही स्थापन केले. सुरुवातीला फक्त शिंदे आणि फडणवीस हे दोनच मंत्री कारभार पाहत होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजूनही काही आमदार मंत्रीपदाच्य प्रतिक्षेत असताना आमदार भरत गोगावले यांच्या मंत्रीपदाची जोरदार चर्चा झाली होती. आपण मंत्रीपद का सोडलं? याचं उत्तर गोगावले यांनी नुकतंच एका कार्यक्रमात दिलं.

गोगावलेंनी मंत्रीपदाचा दावा आधीपासूनच केला होता. अजितदादांनी एन्ट्री घेतल्यानंतर तर त्यांनी आधिक जोर लावण्यास सुरुवात केली. मात्र तरीही संधी काही मिळाली नाही. गोगावलेंना मंत्रीपदाची चर्चा होत असतानाच त्यांनी मंत्रीपद वाटणीसंदर्भात घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख या कार्यक्रमात केला.

मंत्रीपदासाठी सरकारमधील अनेक आमदार इच्छुक होते. त्यांनी नेमकी काय कारणं दिली होती याचा खुलासा गोगावले यांनी केला. आमचे मुख्यमंत्री अडचणीत सापडलेले दिसले आम्हाला. म्हणून मी मंत्रीपदापासून माघार घेतली. मी म्हटलं ठीक आहे. पण काय झालं. एक बोलतो माझी बायको आत्महत्या करेल. एक बोलतो मला नारायण राणे संपवतील. एक बोलतो राजीनामा देईन, अशी भन्नाट कारणे आमदारांनी दिल्याचे गोगावले यांनी सांगतातच उपस्थितही जोराने हसू लागले.

संध्याकाळी फोन करून विचारलं काय रे, संभाजीनगरला तुम्हाला पाचपैकी दोघांना मंत्रीपदं दिली. आम्ही तीनपैकी एकही मंत्रीपद घेतलं नाही. आम्ही थांबतो. पण मी विचारलं तुला एवढी घाई कशाला, त्याला समजावलं. आता बायको बोलल्यावर काय करायचं. मी साहेबांना म्हटलं त्याला देऊन टाका. मग म्हटलं दुसऱ्याला नारायण राणेंनी संपवायला नको. आपली एक सीट कमी होईल. म्हणून म्हटलं त्यालाही देऊन टाका. मी म्हटलं मी थांबतो तुमच्यासाठी. तेव्हापासून थांबलो ते अजूनही कायम आहे, असे गोगावले म्हणाले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप