नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा हस्तांतरणाला उशिरा का होईना मंजुरी; प्रत्यक्षात कामाला लवकरात लवकर सुरवात करण्याची गरज – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक,21 एप्रिल 2023 :- सततच्या पाठपुराव्यानंतर नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा हस्तांतरण प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. या आधीच महाविद्यालय इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली असल्याने लवकरात लवकर प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामास सुरुवात करण्यात येऊन किमान पुढच्या वर्षापासून तरी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

छगन भुजबळ यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेच्या हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर बांधकामाच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी या महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाची टेंडर प्रक्रिया आठ दिवसात सुरु करण्यात येईल. या कामाला सुरुवात झाल्यानंतर दीड ते दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती गिरीश महाजन यांनी विधानसभा सभागृहात दिली होती.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेस मंजुरी प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालय आवारात मागील वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सुरु करण्यात आले आहे. मात्र या कॅम्पससाठी अधिकच्या जागेची आवश्यकता असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी मौजे म्हसरूळ, ता. जि. नाशिक येथील स.नं. २५७ क्षेत्र १४ हे. ३१ आर जागा विद्यापीठास शैक्षणिक वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल इ. जनहितासाठी उपक्रम राबविणे व विद्यापीठाचे विस्तारीकरण करण्याच्या कामासाठी मिळणेसाठी मागणी केलेली होती.

त्यानंतर छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिक महानगरपालिकेची सदर जागा आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल इत्यादी जनहिताच्या उपक्रमासाठी देण्याकरिता नाशिक महानगरपालिकेचा ठराव करण्यात आला होता. दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी ही जागा वैद्यकीय महाविद्यालयास देण्याकरिता नगरविकास विभागाने मान्यता दिली. मात्र या जागेचे मुल्यांकन २० कोटी ३ लाख ४० हजार म्हणजे ५० लाखापेक्षा अधिक असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांपर्यंत दि. १२ मे २०२२ रोजी महसूल विभागाला प्रस्ताव सादर केला होता. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून जागा हस्तांतरणाचा हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. त्यानंतर विधीमंडळात त्याचप्रमाणे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तसेच दूरध्वनीच्या माध्यमातून भुजबळांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर उशिरा का होईना या महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आता लवकरात लवकर या महाविद्यालयाच्या बांधकामास प्रत्यक्षात सुरुवात करून ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे किमान पुढच्या वर्षापासून तरी या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरु केली जावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

या ठिकाणी केवळ वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय नव्हे तर हे कॅम्पस मेडिकल क्षेत्रातील देशातील आगळे वेगळे कॅम्पस करण्याचे भुजबळांचे प्रयत्न आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सुसज्ज रुग्णालय, पीजी इन्स्टिट्यूट सोबतच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, शासकीय युनानी महाविद्यालय, शासकीय फिजिओथेरपी महाविद्यालय आणि या पॅथीशी संलग्न रुग्णालये निर्माण होऊन भविष्यात हा कॅम्पस देशातील वैद्यकीय क्षेत्राची एक वेगळी ओळख निर्माण करेल.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप