भाजपचे अपयश झाकण्यासाठी केले सुशोभीकरण पण झाले विद्रुपीकरण – राष्ट्रवादी काँग्रेसची जी 20 च्या नियोजनावर टीका

पुणे, १६ जानेवारी २०२३ : जी २० परिषदेचे संयोजन भारताकडे येणे आणि त्यातील काही बैठका पुण्यात होणे ही स्वागतार्हच बाब आहे. परंतु, या बैठकीसाठी सुशोभीकरण, नियोजन करताना महापालिका व जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. त्याचबरोबर सुशोभीकरणाच्या नावाखाली शहराचे विद्रुपीकरणच करण्यात आल्याची  टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी सोमवारी केली.
अॅड. चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. जी २० परिषदेत फक्त संबंधित देशांच्याच प्रतिनिधींनाच सहभागी होता येते. त्यासाठी विविध नियम असले तरी शहरातील सर्व आमदार, खासदारांना किमान उद्घाटन सत्राला आमंत्रित करायला हवे होते, असे चव्हाण म्हणाल्या.
या बैठकीसाठी शहराचे सुशोभीकरण करण्यापूर्वी शहरातील सर्व आमदार, खासदार, मोठे कलाकार, मान्यवरांशी सल्लामसलत करायला हवी होती. सध्या अस्वच्छ परिसराभोवती पडदे लावून लपवाछपवी सुरू आहे. शहरातील विविध कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन एखादी संकल्पना निश्चित करून सुशोभीकरण करायला हवे होते, असेही चव्हाण म्हणाल्या.
महापालिकेत मागील पाच वर्ष सत्तेत राहिलेल्या भारतीय जनता पक्षाचे अपयश झाकण्यासाठी महापालिका आयुक्त ठिकठिकाणी पडदे लावत लपवाछपवी करत आहेत. गेल्या पाच वर्षात शहरातील सत्ताधारी भाजपने पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या बैठकीसाठी शहराचे सुशोभीकरण करताना पुणे महापालिकेची दमछाक होत आहे. शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल यांची घाईगडबडीमध्ये रंगरंगोटी करण्यात आली. कित्येक ठिकाणचा राडारोडा पाच वर्षात पहिल्यांदाच उचलला गेला. काही ठिकाणी कचरा राडारोडा उचलता न आल्याने पांढरा-हिरवा पडदा टाकून झाकण्यात आला आहे. मंगळवारपासून या निकृष्ट दर्जाच्या सुशोभीकरणाची कामांची पोलखोल करणार असल्याचे जगताप म्हणाले. तर जी २० बैठकीच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष राजकारण करत असल्याचा दावा देशमुख यांनी केला.
फ्लेक्सला राष्ट्रवादीचा विरोधच
पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबरेटिव्ह रिस्पॉन्सने (पीपीसीआर) सुरू केलेल्या नो फ्लेक्स मोहिमेला आमचा पाठिंबा आहे. अनधिकृत फ्लेक्सला राष्ट्रवादी कॉंग्रेसने कायमच विरोध केला आहे. मात्र, एका विशिष्ट पक्षाचे फ्लेक्स शहरभर दिसून येतात. ते पाहून आमचेही कार्यकर्ते फ्लेक्स लावतात. परंतु, फ्लेक्स काढून टाकणे आणि फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. पालिकेने निःपक्षपाती कारवाई करावी, असेही चव्हाण म्हणाल्या.