पवार गटाचे गुडघ्याला बाशिंग, निवडणुकीपूर्वीच जाहीर केले संभाव्य मंत्री

मुंबई, ११ आॅक्टोबर २०२३ ः राज्यात सध्या आगामी निवडणुकांचे वेध लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायाला मिळत आहे. निवडणुक अद्याप झालीही नाही तोवरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजेंडा ठरवण्यात आला आहे. सत्ता येण्याआधीच शरद पवार गटातील कोणते नेते मंत्रिमंडळात असणार आहेत? याचे संकेतच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे मंत्रिमंडळात असणारच, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. मुंबईतील आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात राज्यात सेवा, सन्मान, स्वाभिमान कार्यक्रम राबवणार आहे. यामध्ये राज्याची सेवा, महिलांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं कार्य राष्ट्रावादीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर शरद पवार गटाच्या दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जयंत पाटील राजेश टोपे आणि अनिल देशमुख मंत्रिमंडळात असणार आहेत. राष्ट्रवादीच सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा जळगावच्या कंत्राटी भरतीच्या जीआरची होळी राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बेकायदेशीर बॅनरबाजीविरोधात जीआर काढणार, शाळांची संख्या वाढवणार, दारुची दुकाने कमी करणार, जळगाव कंत्राटी भरतीच्या जीआरची होळी करणार, एसटी महामंडळासाठी पुरेशा निधीची तरतूद देणार ही कामे करणार आहे.

विशेष अधिवेशनासाठी २५ कोटी रुपये खर्च :
विशेष अधिवेशनासाठी सरकारने प्रतिदिवस 5 कोटी म्हणजे 25 कोटी रुपये खर्च केले आहेत. आम्हाला अधिवेशनाला बोलावलं तेव्हा वाटलं की महिलांसाठी काहीतरी असेल पण महिला आरक्षण विधेयक हे इथून पुढील काळात 10 वर्षांनंतर लागू होणार आहे. त्यामुळे हे महिलांच्या समर्थनात दुसरं काही नसून सर्वात मोठा जुमला असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांसदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.