बारसू रिफायनरी वाद – ‘उद्धव ठाकरे यांच्यामुळे पाकिस्तानचा फायदा’- भाजपची जळजळीत टीका
मुंबई, ४ ऑगस्ट २०२३ : बारसू येथील रिफायनरी महाराष्ट्राच्या हिताची आहे. या रिफायनरीला आपण उशीर केल्याने यामध्ये सरकारी कंपन्यांबरोबर जी परदेशी कंपनी महाराष्ट्रात येणार होती, ती कंपनी आता पाकिस्तानला गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधामुळे पाकिस्तानला फायदा होणार आहे.
रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात बारसू गावात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी शिंदे-फडणवीस सरकार आग्रही आहे. परंतु स्थानिकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. जनमत लक्षात घेता शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः बारसू दौऱ्यावर जाऊन आले. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी बारसूत जाऊन या प्रकल्पाला विरोध दर्शवला, तसेच आपण ग्रामस्थांबरोबर असल्याचं सांगितलं. बारसूतल्या प्रकल्पाला झालेला विरोध, तिथे झालेली पोलीस कारवाई यामुळे बारसूचा विषय गंभीर बनला. त्यातच हा प्रकल्प मागे पडला.
दरम्यान, बारसूतल्या प्रस्तावित रिफायनरीचा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (४ ऑगस्ट) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडला. तसेच हा प्रकल्प रखडल्याने झालेल्या नुकसानाचा उल्लेख केला. त्याचबरोबर या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली
देवेंद्र फडणवीस म्हणाले, बारसूसंदर्भात सांगितलं पाहिजे की, ही रिफायनरी महाराष्ट्राच्या हिताची आहे. या रिफायनरीला आपण उशीर केल्याने यामध्ये सरकारी कंपन्यांबरोबर जी परदेशी कंपनी महाराष्ट्रात येणार होती, ती कंपनी आता पाकिस्तानला गेली आहे. त्यामुळे पाकिस्तानला फायदा होणार आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभेतील निवेदनाचा हा व्हिडीओ भारतीय जनता पार्टीने ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावल्याची टीका केली आहे. महाराष्ट्र भाजपाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तुम्हाला अत्यानंद झाला असेल की तुम्ही आपल्या कोकणातल्या नाणार प्रकल्पाला विरोध करुन पाकिस्तानच्या ढासळत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला. तुमच्या सुपुत्राने म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याबद्दल आक्षेप नोंदवला होता. आपल्याकडे सरकारी कंपन्यांबरोबर जो परदेशी गुंतवणूकदार होता त्याने पाकिस्तानात रिफयनरी प्रकल्पासाठी पैसे गुंतवले. आता याची नैतिक जबाबदारी घेण्याची हिंमत दाखवू शकता का?
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप