भाजपने देशद्रोही ठरवलेल्या नवाब मलिक यांना जामिन मंजूर
मुंबई, ११ ऑगस्ट २०२३: राष्ट्रवादी काँग्रसचे नेते, आमदार नवाब मलिक यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला आहे. दोन महिन्यांसाठी हा जामीन असणार आहे.
मलिक यांना भाजपने देशद्रोही ठरवलेले होते त्यांच्या वरात आंदोलने देखील केलेली होती आता येत्या काळात भाजपची त्यांच्याबद्दल भूमिका काय राहणार याकडेही लक्ष लागले आहे.
नवाब मलिक यांच्या वैद्यकीय कारणासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण, १३ जुलैला उच्च न्यायालयाने मलिक यांचा जामिन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे मलिकांना धक्का बसला होता. त्यामुळे नवाब मलिकांना आणखी किती दिवस तुरुंगात काढावे लागणार? अशा चर्चा रंगल्या होत्या. पण, अखेर मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अंडरवर्ल्डशी असलेलं कथित प्रकरण आणि मनी लाँण्ड्रिंग प्रकरणात २३ फेब्रवारी २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. पण, किडनी संबंधित असलेल्या दुर्धर आजाराशी मलिक यांना ग्रासलं होतं. दरम्यान, मलिक किडनी आजाराशी ग्रासलेलं असून, त्यांना जामीन देण्याची मागणी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली. यावर ईडीकडून महाधिवक्ता तुषार मेहता यांनीही विरोध दर्शवला नाही.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना नवाब मलिक यांच्या जामिनाबाबत विचारले असता त्यांनी याबाबत स्पष्ट उत्तर दिले नाही. ” मलिक यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे. त्याबाबत आम्ही काहीही बोलू शकत नाही. मलिक यांनी अजित पवार यांच्याकडे गटाला पाठिंबा दिल्यास त्याबाबत भाजपची भूमिका काय राहणार ?असे विचारले असता केशव उपाध्ये यांनी “जर तर चे उत्तर देणार नाही, त्यास काही अर्थ नाही”, असे सांगत नवाब मलिक यांच्याबद्दल जास्त बोलण्यास नकार दिला.