बदलापूर प्रकरण, शिंदेचे एनकाऊंटर: फडणवीसांची विरोधकांवर टीका
मुंबई, २३ सप्टेंबर २०२४ : बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला केला आहे. ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून त्याला चौकशीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. यावेळी अक्षयने पोलीसांजवळील बंदूक हिसकावरून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात या आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे. तसेच सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर संशय घेण्यास सुरुवात केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खरमरीत उत्तर दिले आहे.
ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमने आज अक्षयला तळोजा जेलमधून ताब्यात घेतले होते. तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरीता घेऊन असताना मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोहोचताच अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकली आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात अक्षय जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या वाहनातच घडला.
काही दिवसांपूर्वीच बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. त्यानंतर अक्षय शिंदे याला अटकही करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. असे असतानाच अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
“या प्रकरणातील आरोपीच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. यासंदर्भात चौकशी करण्याकरिता त्याला नेण्यात येत होतं. त्यावेळी त्याने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनीही स्वरक्षणार्थ त्याच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, मला जी माहिती मिळाली आहे. विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जातं. हा तोच विरोधीपक्ष आहे, जो आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होता. मात्र, आता आरोपीने पोलिसांवर गोळाबार केला, तेव्हा विरोधीपक्षाकडून आरोपीची बाजू घेतली जात आहे. हे चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.