‘औरंगजेब मुसलमानांचाही नेता नाही’ – देवेंद्र फडणवीस
मुंबई, ३ आॅगस्ट २०२३ : या देशात औरंगजेब हा कोणाचाच, अगदी मुसलमानांचाही नेता होऊ शकत नाही. तो आक्रमणकारी होता. तो वंशाने टर्किश मंगोल होता. आमच्या देशातील मुसलमान हे इथेच जन्माला आले. भारतातील मुसलमान औरंगजेबाचे वंशज नाहीत. या देशात तो कोणाचा
नायक होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हे, नायक होऊ शकतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मात्र, औरंगजेबाचे स्टेट्स ठेवून तरुणांची माथी भडकविण्याचे काम कोणाकडून तरी करण्यात येत आहे. या मागे कोणाचे षडयंत्र आहे का, याच्या खोलाशी आम्ही जात आहोत. ‘एटीएस’, ‘आयबी’ देखील यावर काम करत आहेत. आवश्यकता लागल्यास या प्रकरणाची एसआयटी चौकशी देखील करू, असेही ते म्हणाले. राज्यात जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. महापुरुषांचा अवमानही सहन करणार नाही. जर कोणी करत असेल तर माझा सख्खा भाऊ असला तरी कारवाई करेन, असा सज्जड इशाराही फडणवीस यांनी या वेळी दिला.
औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नका
फडणवीस म्हणाले, की विनाकारण दंगली होणे, सामाजिक तणाव निर्माण होणे हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही. त्याचा आपल्या प्रगतीवर परिणाम होत असतो. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले त्यावेळी त्यांनादेखील मी आवाहन केले. कारण ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांना विनंती केली होती की, औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नका. “औरंगजेबाच्या कबरीवर जाणे हा गुन्हा नाही. दोन धर्मात तेढ निर्माण करणे, स्टेट्स ठेवून तेढ निर्माण करणे हा गुन्हा आहे,” असे फडणवीस यांनी या वेळी नमूद केले.