चिंचवडमध्ये पवारांकडून भाजप फोडण्याचा प्रयत्न

पुणे, १९ सप्टेंबर २०२४ : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडत असतानाचा पिंपरी-चिंचवडच्या विद्यामान भाजप आमदार अश्विनी जगताप शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे. मात्र, आता या चर्चांमध्ये स्वतः अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार या केवळ अफवा असून, माझ्याविरोधात अफवा पसरवणं हे विरोधकांचे काम असल्याचेही जगताप यांनी म्हटले आहे. सक्षम उमेदवार नसल्याने शरद पवार यांच्याकडून पिपंरी चिंचवड मध्ये भाजप फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आणि अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. भाजपकडूनदेखील शंकर जगताप यांना झुकतं माप देण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अश्विनी जगताप तुतारी हाती घेणार अशी चर्चा होती. मात्र, यावर बोलताना अश्विनी जगताप यांनी या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास त्यांना बहुमताने निवडून आणणार असेही अश्विनी जगताप यांनी म्हटले आहे.

शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांवर बोलताना अश्विनी जगताप म्हणाल्या की, सुरू असलेल्या चर्चा या केवळ अफवा आहेत. लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप हे दीर्घ आजारी असतानासुद्धा विधानसभेमध्ये रूग्णवाहिकेमधून मतदानासाठी गेले होते. त्यांची जी पक्षाविषयी निष्ठा होती हे त्यांनी त्यांच्या याकृतीतून दाखवून दिल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही स्रव जगताप कुटुंबीय चालणारे आहोत. त्यामुळे पक्षांतर करणार हे कुणीतरी वावटळं उठवतं असून, हे पूर्णपणे चुकीचं असल्याचे त्या म्हणाल्या.

मविआत चिंचवडची जागा कुणाला?

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, ज्या मित्र पक्षाचा विद्यमान आमदार त्याच पक्षाला त्या ठिकाणचे तिकीट, असा अघोषित नियम आहे. या नियमानुसार भाजपला चिंचवड मतदारसंघ मिळणार हे नक्की. मात्र महाविकास आघाडीकडून कोणाला जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी देखील या मतदारसंघावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रबळ दावा असून त्यांनाच ही जागा सुटेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच त्या दृष्टीने पवारांनी देखील आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे.

पवारांना उमेदवार आयात करावा लागणार

आजघडीला चिंचवड विधानसभा मतदारसंघात शरद पवारांकडे उमेदवार म्हणून तगडा कुठलाही राजकीय नेता दिसत नाही. पोटनिवडणुकीत ज्या नाना काटेंनी अश्विनी जगताप आणि भाजपला मोठी टक्कर दिली होती, ते आजघडीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे पवारांना चिंचवडमध्ये उमेदवार आयात करावा लागणारस हे मात्र नक्की आहे.