भाजपकडून अजित पवारांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न – रोहित पवार यांचा आरोप
पुणे, १७ ऑक्टोबर २०२३: पुणे पोलिसांच्या येरवडा येथील तीन एकर जमिनीचा २०१० मध्ये विभागीय आयुक्तांनी लिलाव केला होता. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ही जमीन हस्तांतरित करण्याचा आदेश दिला होता, असा गौप्यस्फोट माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला होता. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांची ताकद आणि जनतेतील प्रतिमा कमी करण्याचं काम भाजपा करत आहे. अचानक हा मुद्दा समोर आल्यानं अजित पवारांना उत्तर द्यावं लागत आहे. भाजपाकडून कुणीही बोलत नाही.”
“लोकनेत्यांना संपवणं ही भाजपाची प्रवृत्ती आहे. पंकजा मुंडेंना भाजपात संघर्ष करावा लागत आहे. मोहिते-पाटलांसह भाजपा गेलेल्या अन्य लोकांची ताकद कमी करण्यात आली. लोकांना जवळ करून भाजपा संपवते. भाजपाला वाटतं स्पर्धा कमी झाली. पण, महाराष्ट्र उत्तर प्रदेशसारखा नाही. नेता आलं, तर लोक तुमच्या पाठीमागे येणार नाहीत. लोक हुशार आहेत. कुठल्या विचारांशी प्रामाणिक राहायचं, हे जनतेला माहिती आहे,” असं रोहित पवारांनी म्हटलं.
दरम्यान, मीरा बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. “येरवड्यामधील सरकारी भूखंड विकसनासाठी खासगी विकासकाला देण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारनं घेतला होता. तो निर्णय मी घेतला नव्हता. माझ्यावर होत असलेल्या आरोपात तथ्य नाही,” असं अजित पवारांनी सांगितलं.