पुण्यात निखिल वागळे यांच्यावर हल्ला ; तरी निर्भर सभा यशस्वी
पुणे, ९ फेब्रुवारी २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या बद्दल आक्षेपार्य टिपणी केल्याने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना आज भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागले. पुण्यात निर्भय बनो या सभेसाठी वागळे पुण्यात आलेले असताना त्यांच्यावर खंडोजीबाबा चौक ते दांडेकर पूल यादरम्यान शेकडो भाजपच्या कार्यकर्त्यांनी काठ्या, दगडे, विटा यांनी हल्ला चढवला. सुदैवाने वागळे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान हा हल्ला होऊन देखील पुरोगामी संघटनांनी निर्भय म्हणून ही सभा यशस्वी केली.
पुरोगामी संघटनांच्या वतीने हा राज्यभरात निर्भय बनो ही व्याख्यानांची मालिका आयोजित केली जात आहे. हा कार्यक्रम आज पुण्यात दांडेकर पूल येथील साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यावर वागळे यांनी एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराचा सन्मान केला अशा प्रकारचे ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अडवाणी यांच्यावर टीका केली होती. ही टीका भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी त्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करून गुन्हा नोंदविलेला आहे. दरम्यान, वागळे हे पुण्यात निर्भय बनो या सभेसाठी येणार असल्याचे कळताच भाजपने या कार्यक्रमास करून वागळे यांनी येऊ नये या संदर्भात पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली. मात्र पोलिसांनी वागळे यांच्या उपस्थित राहण्यावर कोणतीही हरकत घेतलेली नाही. त्यामुळे सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलेला होता.
आज सायंकाळी ही सभा होत असताना दुपारपासून दांडेकर पूल परिसराला छावणीचे स्वरूप आलेले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास वागळे हे सभेच्या ठिकाणाकडे निघालेले असताना खंडोजीबाबा चौकात त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. दगडफेक करण्यात आली, यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. चौकाचौकांमध्ये भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी व पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रस्ता मोकळा करून देत सुरक्षितपणे सभेच्या ठिकाणी पोहोचविले. दरम्यान या सर्व प्रकारामुळे शहरातील कायदास व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे.