आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला ; चाकणकर-अंधारेंची सरकारवर टीका
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२३ : आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा राज्य महिला आयोग कडक शब्दात निषेध करत आहे. विद्यार्थी, महिला यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या बिट मार्शल, दामिनी पथकाला आणखी बळकट करावे. गृहविभागाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. राजकारणात शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांवरच अशाप्रकारचे हल्ले होत असतील, कायम असुरक्षितता वाटत असेल. तर इतर सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला करण्यात आला. एका महिला आमदारावर झालेला हा हल्ला एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे. समोर येऊन वार करा असे भ्याडपणे मागून हल्ला करु नका” अशा शब्दात प्रज्ञा सातव यांनी या हल्ल्याचा निषेध केला. काल रात्री हा हल्ला झाला होता. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, हा हल्ला दुर्दैवी असून एका महिला आमदारावर हल्ला होणे हे गंभीर आहे. प्रज्ञा सातव यांना सुरक्षा व्यवस्था द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप