विधानसभेची निवडणूक शिंदेच्या नेतृत्वात, मुख्यमंत्रीपदाच नंतर निर्णय: देवेंद्र फडणवीस

मुंबई, ६ सप्टेंबर २०२४: महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जात नसल्याने उद्धव ठाकरे नाराज असताना आता महायुतीमध्ये मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद नाही. विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय महायुती एकत्रीतपणे घेईल असे स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत भाष्ट केले.
“मुख्यमंत्रिपदाबाबत संसदीय मंडळ निर्णय घेईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रमुख नेते याबाबत जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. सध्या तरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाताना आम्ही सर्वजण सरकार म्हणून लोकांसमोर जाणार आहोत. आमच्या सरकारचा नेता कोण असणार तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वातच जनतेसमोर जाऊ”. फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सविस्तर उत्तर दिलं.

ख्यमंत्रिपदाबाबत फडणवीसांचं उत्तर एकून त्यांना विचारण्यात आलं की एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असा तुम्ही किंवा पक्षाने त्यांना शब्द दिलेला नाही असं समजायचं का? त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, “एकनाथ शिंदे विधानसभेनंतर मुख्यमंत्री होतील किंवा नाही याबाबतची चर्चा आमच्या स्तरावर होत नाही. त्या एनडीए आणि भाजपा कार्यकारिणीच्या स्तरावरील चर्चा आहेत, त्यामध्ये आम्ही नसतो. आमचं संसदीय मंडळ मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेईल. त्यांची याबाबत काही चर्चा झाली असेल तर ती काही काळाने आपल्यासमोर येईलच. त्यानुसार आमचा निर्णय होईल. मला वाटतं यावर आम्ही काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. भाजपाचं संसदीय मंडळ, शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार मिळून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतील. हे सर्व नेते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल”.