”त्यांनी राजीनामा का मागे घेतला ते त्यांना विचारा” उदयनराजे यांची शरद पवारांवर टीका

वाई, १६ मे २०२३ : कर्नाटक येथील विधानसभेचा निकाल हा सर्वच पक्षांना आत्मचिंतनासाठी महत्त्वाचा आहे. सर्वच पक्ष यावर आत्मचिंतन करतील असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांनी साताऱ्यात त्यांच्यावर केलेल्या टीकेला मी राजीनामा दिला मागं घेतला का त्यांनी राजीनामा दिला मागे घेतला त्याबद्दल त्यांना विचारा मात्र आमच्या घराण्याला विश्वासघात करण्याची परंपरा नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली.

खासदार उदयनराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने  साताऱ्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी जलमंदीर या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाबाबत बोलताना ते म्हणाले. कर्नाटकचे स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या बाबत असणारे मतदारांचे दृष्टिकोन हे वेगवेगळे असतात त्याचा परिणाम हा असू शकतो. काही गोष्टी खिलाडूपणे घेतल्या पाहिजेत. निवडणुकीत जय पराजय होत असतात. प्रत्येक ठिकाणचा पॅरामीटर वेगवेगळा असतो. निवडणुकीतले शेवटचे तीन दिवस महत्वाचे असतात. या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत कोणताही फरक पडणार नाही असे उदयनराजे म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांचा व्यासंग ही अफाट आहे. त्यामुळे सातारा लोकसभेच्या मागील निवडणुकीतील निकालाबाबत ते जे म्हणाले ते योग्य आहे. मात्र मी राजीनामा दिला पण मागे घेतला नाही त्यांनी राजीनामा दिला आणि परत मागे घेतला.याबाबत त्यांना विचारा. यावरून निवडणुकीत कोण काय करते, काय नाही हा भाग नाही. पण आमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा नाही असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना लगावला.

खासदार संजय राऊत यांच्या काही वादग्रस्त विधान बाबत त्यांना विचारले असता, खासदार संजय राऊत हे सर्व पक्षांच्या संदर्भात बोलत असतात सर्वच पक्षांनी ठरवून त्यांना सामूहिक प्रवक्ते पद द्यावे असे ते म्हणाले.केरला स्टोरी चित्रपट पाहिला नाही त्यामुळे कर्नाटक निवडणुकीवर परिणाम झाला का सांगता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत रामराजेंना सातारा अथवा माढा मतदार संघातून उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झाल्या बाबतच्या प्रश्नावर लोकशाही आहे कोणीही कुठुन ही उभ राहु शकतो असे ते म्हणाले.