मोदी दिल्लीला जाताच अजित पवारांनी केले मणिपूरच्या हिंसाचारावर भाष्य
पुणे, १ ऑगस्ट २०२३ : कोणत्याही देशातील पंतप्रधानाला किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याच्या भागात कायदा व स्वस्त पाहिजे असेच वाटत असते. हिंसा व्हावी असे कधीही वाटत नाही. मणिपूर मध्ये जो प्रकार सुरू आहे तो त्वरित थांबला पाहिजे आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या हिंसाच्या घडणाऱ्यांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होताच अजित पवार यांनी मणिपुरवर भाष्य केले
मागील जवळपास तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित महिलांवर सामुदायिक बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचं कुणीच समर्थन करू शकणार नाही. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या लोकांना कडक शासन झालं पाहिजे, अशी मागणी अजित पवारांनी केली. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर अजित पवारही उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी पुण्यात मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली.
यावेळी अजित पवार म्हणाले, “देशाचे पंतप्रधान कुणीही असले तरी त्यांना भारतात सगळीकडे चांगलं वातावरण राहावं, असंच त्यांना वाटत असतं. कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांना किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असंच वाटतं की, आपल्या इथे कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. लोकांमध्ये सुरक्षितेचं वातावरण राहिलं पाहिजे. पण मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचं कुणीचं समर्थन करणार नाही. ती माणुसकीला काळीमा फासणारीच घटना आहे. त्याची नोंद सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी घेतली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यावर प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे.”
देशातील विविध भागात या प्रकरणाचा निषेध केला आहे, ते आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. भारतीय संस्कृतीत महिलांना आदराचं स्थान आहे. महिलांना आपण सन्मानाने वागणूक देतो, हाच आपल्या सर्वांचा इतिहास आहे. असं असताना आपल्या भारतात जे घडलं ते सर्वांसाठी मान खाली घालायला लावणारी घटना आहे. जगानेही या घटनेची नोंद घेतली. जगभरातील विविध देशांतील नेत्यांनी त्यावर आपापली भूमिका मांडली. यामध्ये जो दोषी आहे, त्यांना कडक शासन झालं पाहिजे. त्यानंतर असं कृत्य करण्याचं कुणाचंही धाडस झालं नाही पाहिजे, असा संदेश यातून गेला पाहिजे. याची खबरदारी केंद्र आणि राज्य सरकार घेत आहे”, असंही अजित पवार म्हणाले.