५० खोके, नागालँड ओके ची घोषणा देताच अजित पवारांचा वाढला पारा

मुंबई, ९ मार्च २०२३ ः नागालँडमध्ये सरकार स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधात न बसता सत्ताधारी एनडीपीपी आणि भाजपच्या सरकारला पाठिंबा देऊन टाकला. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळे त्यावर सत्ताधारी शिंदे सरकारकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करून ‘५० खोके नॅगालँड ओके’ अशी घोषणा सभागृहात दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पार वाढून ते सभागृहात संतापले व गुलाबराव पाटील यांच्यावर तुटून पडले.

नेमकं काय झालं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अवकाळीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यासंदर्भात चर्चा चालू असताना राजकीय टोलेबाजी सुरू होताच कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँडमधील परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला.
“या देशात आणि राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले अशी वक्तव्य आम्ही टीव्हीवर बघत आहोत. नागालँडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपाच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला आहे. म्हणजे बदलाचे वारे नेमके कसे वाहायला लागले आहेत? नागालँडमध्येही ५० खोके, बिलकुल ओके असं काही झालंय का? एकीकडे इथे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचं असं चित्र निर्माण झालंय. ५० खोके आणि बिलकुल ओके, नागालँड ओके असं झालंय का?” असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले. पवार म्हणाले, “मंत्रीमहोदयांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायला हवं असं नाहीये. राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना. ही कुठली पद्धत काढली? तुमच्या हातात आहे ना? मग करा ना चौकशी. कारण नसताना कुणावरही कसलेही आरोप का करताय?”

“नागालँडमधली परिस्थिती वेगळी आहे. तिथे सर्व पक्ष एकत्र मिळून सरकार स्थापन करतात अशी परंपरा आहे. भारतातला तो भाग भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतला आहे. त्याची चर्चा इथे करून गैरसमज पसरवण्याचं काहीच कारण नाही”, असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलं. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महाराष्ट्रात देखील दरवेळी काही झाले की खोक्यांचा विषय काढला जातो. हा विषय बंद करा आम्हाला तुमचा आपमान करायचा नाही असे विरोधकांना सांगितले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप