कश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू होणार नाही – काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी

पुणे, ११ मे २०२४: ‘आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) जाचक तरतुदींचा वापर विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केला जात असून, भयाचे वातावरण तयार केले जात आहे. इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर या जाचक तरतुदींचा फेरविचार करण्यात येईल, तसेच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही,’ असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी शनिवारी सांगितले. ‘निवडणुकांमध्ये भाजपकडून ‘व्हिटॅमिन एम’ म्हणजे पैशांचा भरपूर दुरुपयोग केला जात असून, त्यामुळे लोकशाहीचा अंत होईल,’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात सिंघवी बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम ३७० पुन्हा लागू करणार का, या प्रश्नावर बोलताना सिंघवी यांनी भाजपकडून अशी खोटी गृहितके मांडण्यात येत असल्याचा पलटवार केला. ‘इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होईल, हिंदूंची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटली जाईल, वारसा कर लावला जाईल, असा काल्पनिक प्रचार भाजपकडून केला जात असून, जनतेला घाबरवून, धमकावून, वाट्टेल ते बरळून आणि दिशाभूल करून मते मागितली जात आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.

‘यंदाची लोकसभा निवडणूक ही ‘आयडिया ऑफ इंडिया’ची असून, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही ही तिची मूल्ये आहेत. ती राज्यघटनेतून प्रतिबिंबित होतात. परंतु, मोदी सरकारकडून राज्यघटनेची मोडतोड केली जात आहे. संघराज्य व्यवस्थेवर आघात केला जात आहे. इडी, सीबीआयचा दुरुपयोग होत आहे.

न्यायपालिकेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाही संस्थांवर दबाव आणण्यात येत आहे. पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून, अंमली पदार्थ तस्करीही वाढली आहे. या मुद्द्यांसोबतच राज्यघटनेच्या संरक्षणासारखे मूलभूत मुद्देही मतदारांनी लक्षात ठेवावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.