कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो; पंकजा मुंडे यांचे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य

पिंपरी, २० फेब्रुवारी २०२३ : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तर, सध्या सत्तासंघर्षाच्या काळात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं पार जड झालं आहे. चिन्ह मिळाल्यावर भाजपा आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या परिस्थितीवर “एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो, तो संदेश यशस्वी करणं आणि भविष्यात त्यांच्याबरोबर असलेले सर्व लोकं निवडून आणणं ही मोठी संधी आहे”, असे भाष्य केले.

भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रविवारी सभा आयोजित केली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “या सर्व राजकीय परिस्थितीतीकडे कुतूहलाने पाहिलं आहे. माझे प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सध्याचा काळ कसोशीचा आहे. सरकार आल्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यापूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो आणि तो पक्षाचं नेतृत्व करु शकतो, असा संदेश दिला आहे.”

“तो संदेश यशस्वी करणं आणि भविष्यात त्यांच्याबरोबर असलेले सर्व लोकं निवडून आणणं ही मोठी संधी आहे. सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी आहे. तर, नाव नसताना पक्ष उभा करणं हा उद्धव ठाकरेंसमोर प्रश्न आहे. त्या प्रश्नाची उत्तर शोधून ते पुढं जातील. दोघेही जण कुतूहलाचा विषय आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि भाजपाची युती असून, त्यांचं सरकार आहे,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

“उद्धव ठाकरेंशी बहीण म्हणून चर्चा केली, ते सर्वांसमोर कसं सांगू. उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याएवढी मोठी नाही. सर्वांची लहान बहीण आहे,” अशी टीप्पणी पंकजा मुंडेंनी केली आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप