पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया: “देशात अराजकता निर्माण होऊ नये, काळजी घेणे आवश्यक”

पुणे, २८ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करून गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “या हल्ल्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे. केंद्र सरकारकडून चोख प्रत्युत्तर अपेक्षित आहे. मात्र, अतिरेक्यांना जे अभिप्रेत होतं त्या पद्धतीने वातावरण दूषित होऊ नये यासाठी आपण समाज म्हणून, देश म्हणून जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे.”

पुण्यातील एस.एम. जोशी सभागृहात पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या कोल्हेंनी हल्ल्याबाबत आपले मत मांडले.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कोल्हे म्हणाले, “दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान केलं, त्यामध्ये ज्यांना गोळ्या लागल्या त्या कुटुंबांप्रती माझ्या मनात संवेदना आहेत. मात्र, दहशतवाद्यांच्या त्या वाक्याने देशातील परिस्थिती प्रदूषित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता का, याबाबत बारकाईने विचार करावा लागणार आहे. त्यांच्या फूट पाडण्याच्या प्रयत्नांना आपण यशस्वी होऊ देता कामा नये. सध्याच्या घडीला विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या पाठीशी आहे.”

राज्य सरकारच्या शंभर दिवसांबाबत विचारल्यावर कोल्हे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या प्लॅनचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहिजे. केवळ जाहिरातबाजी न करता सरकारने शंभर दिवसात केलेली कामगिरी स्पष्ट केली पाहिजे.”

शिवसेना आणि मनसे युतीबाबत विचारले असता कोल्हे म्हणाले, “हा निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घ्यायचा आहे. जर पवार साहेबांची भूमिका पाहिली तर ते सांगतात आणि बांधतात ते धोरण.”

दहशतवाद्यांनी धर्म पाहून गोळीबार केल्याच्या प्रकारावर कोल्हे म्हणाले, “दहशतवाद्यांनी का अशा प्रकारे वागले याचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. जर देशात अराजकता पसरली, तर आपण पाकिस्तानला ज्या ताकदीने प्रत्युत्तर दिलं पाहिजे, त्यात अडथळा येऊ शकतो. देशाने एकसंघ राहून दहशतवाद्यांना कडक उत्तर दिलं पाहिजे. देशात अंतर्गत युद्ध घडवण्याचा दहशतवाद्यांचा हेतू आहे का, आणि आपण अनवधानाने त्यांच्या हेतूला खतपाणी घालत आहोत का, याचाही विचार करायला हवा.”