सहानुभूती सोबतच संवेदनेने सामाजिक कार्यात उतरलो
पुणे, दि. १ ऑक्टोबर, २०२३ : भिक्षेकऱ्यांसाठी काम करण्याच्या उद्देशाने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि रस्तोरस्ती रुग्ण तपासणीचे, गोळ्या औषधांचे सामान घेऊन दुचाकीवरून फिरू लागलो. मात्र, सुरुवातीला भिक्षेकरी रुग्ण मला भामटा समजत, काठ्या उगारत अगदी थुंकत देखील होते. या वेळी सामाजिक कार्य करताना केवळ सहानुभूती असून चालणार नाही तर संवेदनाही महत्त्वाची आहे हे उमगले असे प्रतिपादन भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ अभिजित सोनवणे यांनी केले.
पी. एम. शहा फाऊंडेशन व वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सामान्य ते असामान्य’ या प्रकट मुलाखत व संवादात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील वर्धमान प्रतिष्ठानच्या सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला.
पी. एम. शहा फाऊंडेशनचे संचालक अॅड चेतन गांधी, वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड, चंदुकाका सराफचे संचालक अतुल शहा, सरस्वती मेहता आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने मानपत्र देत डॉ सोनवणे दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. याबरोबरच वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड यांनी डॉ सोनवणे यांच्या कार्यास मदत म्हणून रुपये ५१ हजार जाहीर केले. यानंतर मोनिका जोशी आणि अॅड चेतन गांधी यांनी डॉ अभिजित व डॉ मनीषा सोनवणे यांची प्रकट मुलाखत घेतली.
माणसाचे आयुष्य हे केवळ तीन पानांचे असते. पहिले पान जन्माचे, तिसरे पान मृत्यूचे म्हणजे माणूस केवळ दुसऱ्या म्हणजे एकाच पानात आयुष्य जगतो असे सांगत डॉ अभिजित सोनवणे यांनी आपला डॉक्टर म्हणून झालेला सुरुवातीचा खडतर प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. ते पुढे म्हणाले, “जी लोकं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जागी असतात ते जागरण करतात मात्र जी लोक दुसऱ्यांच्या प्रगतीचा विचार करत रात्रभर जागी असतात ते जागृतीच्या भावनेने भारावलेले असतात. हाच जागरणा पासून जागृतीपर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे असे मी मानतो. सहानुभूतीने काम करीत संवेदनेने एखाद्याचे आयुष्य बदलणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.”
चार भिंतींबाहेर आज आमचे तब्बल ११०० लोकांचे कुटुंब आहे. यामध्ये आम्हाला आई- बाबा, मुले-मुली, काका-मामा अशी अनेक नाती मिळाली. ती जपताना तारेवरची कसरत होत असली तरीही दिवसांच्या शेवटी मिळणारे आंतरिक व मानसिक समाधान आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉ मनीषा म्हणाल्या.
भिक्षेकऱ्यांच्या क्षमता, कौशल्य ओळखत त्यांच्या हाताला काम देत त्यांना कष्टकरी बनविण्यासाठी आम्ही त्यांना उद्युक्त करीत आहोत. इतकेच नव्हे तर या कष्टकऱ्यांना समाजात मनाचे स्थान मिळावे आणि गावकरी म्हणून इतरांनी त्यांना स्वीकारावे यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत. आजवर १७५ भिक्षेकरी कुटुंबांचे पुनर्वसन केले असून ५२ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही उचलीत आहोत. समाजाच्या मदतीने हे कार्य आम्ही पुढे नेत आहोत असे डॉ अभिजित म्हणाले.
पुणे शहरात तब्बल ६० ठिकाणी डॉ अभिजित आणि डॉ मनीषा हे रुग्णसेवा करीत आहेत. ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे अशांना आवश्यकतेनुसार रुग्णालयातील उपचारही ते उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये सोनोग्राफी, हदयरोग, मधुमेह, मोतीबिंदू यांवरील उपचारांचा समावेश आहे.
आज भीक मागणे हा एक धंदा होऊन बसला असून शहरातील एकूण भिक्षेकऱ्यांपैकी ७५ टक्के हे व्यावसायिक भिकारी असून २० ते २५ टक्के भिक्षेकरी पर्याय नाही म्हणून भीक मागतात अशी माहिती डॉ सोनवणे यांनी दिली. नागरिकांनी रस्त्यावर भीक मागणाऱ्या कोणालाही भीक देऊ नये, इच्छा असेलच तर त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नक्की मदत करा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
डॉ सोनवणे दाम्पत्यांसारखे नागरिक आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण करतात. समाजाला दिशा देण्यासाठी प्रयत्न करतात. ‘सामान्य ते असामान्य’ या मुलाखत व संवादात्मक कार्यक्रमात हाच प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आपल्याला यातून ऊर्जा कशी मिळेल याबरोबरच अशा नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा हा प्रयत्न असल्याचे अॅड चेतन गांधी म्हणाले.
मोनिका जोशी यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले तर अॅड चेतन गांधी यांनी प्रास्ताविक केले.